ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग... - The ruling party and the opposition are facing each other over the Gram Panchayat Bill | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीवर आक्षेप घेतला. या विधेयकाला विरोध करीत विरोधकांनी सभात्याग केला. 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली हे पावसाळी अधिवेशन होत आहे. आज सकाळच्या सत्रात ग्रामपंचायत विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आले. विरोध पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीवर आक्षेप घेतला. या विधेयकाला विरोध करीत विरोधकांनी सभात्याग केला. 

न्यायालयात सुनावणी असताना हे विधेयक आणू नका, न्यायालयाच्या विरोधात सरकार भूमिका घेत आहे. न्यायालयानं जो निर्णय दिला आहे. त्यानुसार नियुक्ती करा,असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यपाल निवडताना आपण काही जाहीरात‌ देत नाही, जो योग्य व्यक्ती असेल त्याला नेमतात. 

खाजगी व्यक्ती आम्ही नेमत‌ नाही, सरपंचांना मुदतवाढ देता येत‌ नाही, असे स्पष्टीकरण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.  देवेंद्र फडणवीस
 म्हणाले, "मी अभ्यास करून आलो आहे. न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सरकाच्या भूमिकेमुळे  संविधानाची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घ्या."

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की आज फक्त विधेयक मांडत आहोत. यावर फडणवीस म्हणाले की मला यावर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्ष नेत्यांची काही तरी गल्लत होत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं.  

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कित्येक दिवस लांबलेले पावसाळी अधिवेशन अखेर आज (ता. 7)  सुरू झाले. अधिवेशनासाठी गेली दोन दिवस सुरू असलेल्या कोव्हिड चाचण्यांमध्ये तब्बल 32 नेते आणि 500 पोलिस कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्याची चर्चा होती. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. 

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती हाताळण्यात येत असलेले अपयश पाहता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारतर्फे पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्या जातील. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या सत्तापक्षाने काल (ता. 6 सप्टेंबर) पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा ठराव करत एकीचा परिचय दिला आहे. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिवेशनात ठेवण्यात येणाऱ्या विधेयकांबद्दल चर्चा झाली. अधिवेशनात सुमारे 14 महत्त्वाची विधेयके मंजुरीसाठी ठेवली जाणार आहेत. महापौर पदाच्या निवडीच्या निवडणुका लांबवण्यापासून तर जिल्हा परिषदेतील नियुक्‍त्या लांबणीवर टाकण्यापर्यंत सर्वच विषयांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 
 
आज सकाळपासूनच ज्यांची टेस्ट निगेटिव्ह आहे त्यांनाच विधान भवनामध्ये प्रवेश दिला जातोय. शनिवार आणि रविवारी विधानभवनात जवळपास दोन हजाराहून अधिक जणांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. यापैकी ५८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आल आहे.  अनेक लोक प्रतिनिधी सुद्धा कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे ज्यांची टेस्ट निगेटिव्ह आहे अशाच अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना विधिमंडळात प्रवेश दिला जात आहे.
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख