गणेशोत्सव काळात असे असू शकतात निर्बंध; नियमावली लवकरच जाहिर होणार  

गणेशोत्सवाच्या काळात कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते.
 Rules for Ganeshotsav will be announced soon  .jpg
Rules for Ganeshotsav will be announced soon .jpg

मुंबई : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव, रात्रीची संचारबंदी असे काही निर्बंध लागू करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत. (Rules for Ganeshotsav will be announced soon) 

गणेशोत्सवाच्या काळात कोरोना संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

गेल्या आठवडयापासून राज्यातील बहुतांश शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी झाली आहे. काही कठोर पावले उचलली नाही तर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढेल व संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यातूनच काही निर्बंध लागू केले जातील. गौरी-गणपती विसर्जनानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढते. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जनानंतर जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री बाहेर पडण्यावर निर्बंध लागू केले जाणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये दर्शन बंद केले जाईल. परिणामी मंडपांमध्ये गर्दी होणार नाही. महानगरपालिकांना या संदर्भातील आदेश काढण्यास सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवाबाबत लवकरच मुख्यमंत्री नियमावली जाहीर करणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी तसेच उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
गणेशभक्तांच्या नाराजीची धास्ती गणेशोत्सवाच्या काळात कठोर निर्बंध लागू केल्यास गणेशभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यावरून भाजप व मनसेकडून वातावरण तापविले जाऊ शकते. हा विषय संवेदनशील असल्याने घाईघाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

दीड दिवसांचे गणपती की गौरी-गणपती विसर्जन झाल्यावर निर्बंध कठोर करायचे याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होईपर्यंत शक्यतो निर्बंध लागू करू नये, असाच साऱ्यांचा सूर आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतरच लोक सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. त्यावेळी निर्बंध कठोर करण्याचा विचार सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यातही चिंता

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ नोंदवण्यात येत आहे. जिल्ह्यात ३ आणि ४ सप्टेंबरला दैनंदिन रुग्णसंख्येने ३०० चा टप्पा ओलांडला होता. सोमवारी जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात आली असून, दिवसभरात २१२ रुग्ण आढळले. मात्र, ही रुग्णसंख्याही ऑगस्ट अखेरच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com