रोहित पवारांनी साहेबांच्या त्या सभेच्या आठवणींना दिला उजाळा...

आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी धो..धो.. पाऊस सुरू होईल, अशी स्थिती होती. पण तरीही त्याची चिंता न करता लोक साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येतच होते.
rohit pawar.jpg
rohit pawar.jpg

पुणे :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा येथील भर पावसातील जाहीर सभा सर्वांना आठवत असेल..या सभेनं विधानसभा निवडणुकीचे चित्रच पालटून गेले. राजकारणातील समीकरणं बदलून गेली. या सभेला आज (ता.18) वर्षपूर्ती होत आहे. सोशल मीडियावर या सभेबाबत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी या सभेचा व्हिडिओ शेअर करून त्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये आमदार रोहित पवार म्हणतात की आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. काही घटनाक्रम हे मनःपटलावर कायमचे कोरले जात असतात. त्यातील ही एक महत्वाची घटना आहे. मला आठवतंय... साताऱ्यात निवडणूक प्रचाराची सांगता सभा होणार होती. आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी धो..धो.. पाऊस सुरू होईल, अशी स्थिती होती. पण तरीही त्याची चिंता न करता लोक साहेबांचे विचार ऐकण्यासाठी येतच होते. क्षणाक्षणाला गर्दी उसळत होती. तरुणांचा सळसळता उत्साह तर भविष्याचं चित्र स्पष्टपणे दाखवणारा होता. अशातच साहेबांची स्टेजवर एन्ट्री झाली आणि साहेबांचं भाषण ऐकण्याचा मोह मेघराजाही आवरु शकला नाही. वरुन मेघराजा बरसत होता आणि त्याच जलधारा अंगावर घेत व्यासपीठावर ८० वर्षाचा तरुण जाणता राजा गर्जत होता. पण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी झालेली अलोट गर्दी किंचितही विचलित न होता स्तब्ध होती. साहेबांचा एक एक शब्द कानात साठवून ठेवत होती. साहेबांनी जाहीरपणे चूक कबूल करत ती दुरुस्त करण्याची साद जनसमुदायाला घातली आणि पुढं काय झालं हे आपल्याला माहीतच आहे..

आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात...
साहेबांचं भाषण संपलं आणि भाषण ऐकण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी आलेला पाऊसही थांबला होता. पण कितीही संकटं आले किंवा लादले तरी महाराष्ट्राचा हा योद्धा कुणापुढं झुकणार नाही, हाच संदेश साहेबांनी या सभेतून दिला आणि त्याचे अपेक्षित परिणाम राज्यात आज पहायला मिळतायेत. कारण मोठ्या कष्टाने कमावलेला राज्यातील सर्वसामान्य माणूस ही साहेबांची खरी ताकद आहे आणि ती कोणीही कमी करु शकत नाही. 

ही एक घटना आहे, पण अशा अनेक प्रसंगांना साहेबांनी धीरोदात्तपणे तोंड देत संकटांना परतवून लावलं, याचा महाराष्ट्र साक्षीदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत. यातील काहींकडं पद जरुर आहे पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी. 

कदाचित त्यांना एकटं पाडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही ते ज्या पक्षात आहेत त्यांचा हा डाव असू शकतो. काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही. साहेबांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र आहे. खोटे-नाटे, कपोलकल्पित आरोप करुन या प्रेमाची नाळ तोडण्याचा विरोधकांनी अनेकदा प्रयत्न केला. साहेबांना मागे खेचण्यासाठी ED सारख्या संस्थांचा गैरवापर करत चौकशीचा ससेमिराही मागं लावण्याचा प्रयत्न झाला. पण साहेब डगमगले नाहीत. ED ची नोटीस आल्यावर भल्याभल्यांची झोप उडते पण साहेबांनी जेंव्हा स्वतःहून ED कार्यालयात चौकशीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला तेंव्हा ED ची झोप उडाली. ...आणि लक्षात घ्या देशाच्या इतिहासात हे असं पहिल्यांदा घडलं.सांगायचं तात्पर्य म्हणजे खुनशी विरोधकांना साहेब समजले नाही आणि समजणारही नाहीत. त्यामुळं त्यांनी साहेबांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्नच करु नये. साहेबांचं नेतृत्व कुठल्या लाटेत वर आलेलं नाही तर त्यामागे त्यांनी तब्बल पाच दशकांहून अधिक काळ केलेली कठोर तपश्चर्या आहे.

साहेब, प्रचंड कष्ट आणि लोकांचं प्रेम या तीन गोष्टी कधीही वेगळ्या करता येणार नाहीत. आजही साहेब त्याच उत्साहात, जोमात काम करताना दिसतात. लोकांमध्ये जातात, त्यांचं दुःख समजून घेतात आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते लोकांच्या हृदयात आहेत. 'सर्वसामान्य लोकांसाठी काम करा', हा साहेबांनी दिलेला मंत्र दीपस्तंभ मानून काम करण्याचा मीही प्रयत्न करतोय. लोकांनीही मला काम करण्याची संधी दिलीय. त्यामुळं प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन साहेबांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा माझा प्रयत्न सुरुय आणि सोबतच साहेबांची ऊर्जाही आहे.
#Saheb

 Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com