रोहित पवारांकडून विरोधकांची कानउघडणी....फेसबूक पोस्ट व्हायरल.. - Rohit Pawar Facebook post appeals to BJP leaders to avoid politics on Corona issue | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवारांकडून विरोधकांची कानउघडणी....फेसबूक पोस्ट व्हायरल..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

भाजपशासित राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे, हे रोहित पवार यांनी भाजपला दाखवून दिले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून लॅाकडाउनची घोषणा  केली आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपशासित राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे, हे रोहित पवार यांनी भाजपला दाखवून दिले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाची आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्राव्यतिरिक्त छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पंजाब, बंगाल, तेलंगणा ,आंध्र प्रदेश, हरयाणा, बिहार आदी राज्यांमध्येही कोरोनाचं संकट भीषण असल्याचं दिसून येतं. इतर राज्यांची आकडेवारी महाराष्ट्राइतकी नसली तरी त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या तुलनेत ती निश्चितच चिंताजनक आहे.

ज्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखे शहरीकरण अधिक आहे तिथं रुग्णांची संख्याही अधिक असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातही एकूण रुग्णांच्या जवळपास ५०% रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर अशा मोठ्या शहरांमध्येच आहेत. वरील राज्यांपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांमधील कोरोना व्यवस्थापन खूपच चांगलं असल्याने तिथं कोरोना येत नाही हा विरोधकांचा दावा फोल ठरतो, असे रोहित पवार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात.... 

मागील वर्षी जानेवारी महिन्यात देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून अविरतपणे आपण या संकटाला तोंड देत आहोत. २०२१ हे वर्ष तरी व्यवस्थित जाईल अशी सर्वांची भावना होती मात्र परत यावर्षी रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि आता ती इतकी वाढली की राज्यात परत एकदा नाईलाजास्तव कठोर निर्बंध घालण्याची वेळ सरकारवर आली.
 
कोरोना लसीकरणात आज महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. आतापर्यंत राज्याने १ कोटी ५ लाख २९ हजार लसी दिल्या. यामध्ये पहिला डोस ९५ लाख २० हजार ७२५ लोकांना तर दुसरा डोस १० लाख ८ हजार लोकांना देण्यात आला. आज आपण दररोज साडेतीन ते चार लाख नागरिकांना लस देत असून आपली लसीकरणाची क्षमता ६ लाख प्रतिदिवसापर्यंत वाढवलीय. लस वाया जाण्याचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे. 
 
आज या घडीला जर गुजरातचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथंही रुगणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरत, अहमदाबाद, जामनगरमध्ये बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एका आघाडीच्या वृत्त वाहिनीने गुजरातच्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं हे केलेलं रिपोर्टिंग आपल्यापैकी अनेकजणांनी पाहिलं असेल. अनेक रुगणांवर हॉस्पिटलच्या आवारात, फरशीवर, खुर्चीवर बसून उपचार चालू असल्याचं त्यात दाखवलं. तर दुसरीकडं मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी आठ-आठ तास थांबावं लागत असल्याचं विदारक चित्र पाहताना मन हेलावून जातं. रुग्णवाहिका नसल्याने कोणी चार चाकीतून डेड बॉडी नेतंय तर कोणी हात  गाड्यावरून आहे. हे आज गुजरातचं भीषण वास्तव आहे. 

उत्तरप्रदेशमध्येही रुग्णांची अवस्था काही चांगली नाही. तिथं तर तीन रुग्णांना लस म्हणून रेबीजचं इंजेक्शन दिल्याची अत्यंत धक्कादायक बाब पुढं आली. बिहारमध्येही कोरोनाचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचे निदर्शनास येतंय. तसंच मृतांची संख्याही सरकार लपवत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. आज देशभरातील सर्वच राज्य सरकार आर्थिक अचणीतून जात आहेत. एकीकडं उत्पन्न खुंटलंय तर दुसरीकडं केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेला हक्काचा निधी मिळत नाहीय. केंद्र सरकारकडं उत्पन्नाचे स्त्रोत्र अधिक असल्याने स्वाभाविकपणे केंद्राने या सर्व परिस्थितीत जास्तीची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे पण तसं होताना दिसत नाही. मानवतेच्या मुळावर उठलेल्या या संकटाचा सर्वांनी एकत्रितपणे मुकाबला करून  संपूर्ण जगाला एक वेगळा संदेश आपल्याला देता येईल. त्याची हीच वेळ आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करुयात आणि कोरोनाच्या संकटाला थोपवूयात!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख