सत्तेसाठी विरोधी पक्ष किती उतावीळ झालाय..रोहित पवारांची भाजपवर टीका - rohit pawar criticizes bjp leaders through facebook post on parambir singh case | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तेसाठी विरोधी पक्ष किती उतावीळ झालाय..रोहित पवारांची भाजपवर टीका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी फेसबूक पोस्ट करीत भाजप नेत्यांवर टीका केली आहे. 

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग याचा लेटबाँम्ब, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी, विरोधकांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल आदी घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी फेसबूक पोस्ट करीत भाजप नेत्यांवर टीका केली आहे. याबाबत रोहित पवार यांनी टि्वट केलं आहे. 

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय  होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या 'प्रेस बाईट'चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात 'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं.

गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

रोहित पवार आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात... 

महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या  गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं. एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख