पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटचा तो रिपोर्ट व्हायरल : 40 लाख आणि दहा तोळ्याच्या अंगठीवर पोवळा रत्न! - report about alleged corruption in Police officers transfers goes viral | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटचा तो रिपोर्ट व्हायरल : 40 लाख आणि दहा तोळ्याच्या अंगठीवर पोवळा रत्न!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 मार्च 2021

महादेव इंगळे हे नाव वादाच्या केंद्रस्थानी

मुंबई : पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रॅकेट झाल्याचा दावा करणारा राज्य गुप्तवार्ताच्या संचालक, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा तो गोपनीय कथित रिपोर्ट सोशल मिडियात व्हायरल झाला असून महादेव इंगळे नावाच्या व्यक्तीने सुमारे 29 पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे कंत्राट घेतले होते. याशिवाय इतर चार अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या बदल्यांबाबतही तो ठामपणे दावा करत होता, असा उल्लेख यात करण्यात आला आहे.  त्यासाठी 40 ते 50 लाख रुपयांच्या रकमेपासून ते दहा ग्रॅम सोन्याच्या अंगळीत पोवळा रत्न बसवून मागत होता, असाही उल्लेख करण्यात आला आहे. याच रिपोर्टच्या आधारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. 

राष्ट्रवादीने हा कथित रिपोर्ट फेटाळला असून या रिपोर्टमधील नावे आणि त्यांना बदली मिळणार असल्याचे ठिकाणे यांचा काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्या अनधिकृतरित्या फोन टॅपिंग करत होत्या, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

काय आहे रिपोर्टमध्ये?

 इंगळेमार्फत पोस्टिंगसाठी प्रयत्न करणाऱ्याअधिकाऱ्यांची यादीही या रिपोर्टसोबत देण्यात आलेली आहे. या यादीतील काहीजणांना चांगले पोस्टिंग मिळाल्याचे त्यानंतर दिसून येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रात उल्लेख असलेल्या एका अधिकाऱ्याचे नावही इंगळे याने घेतलेल्या कंत्राटमध्ये आहे. याशिवाय रायगड, नगर, बीड, बारामती, सोलापूर येथे सध्या नियुक्तीस असलेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. इंगळे हा या अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार पोस्टिंग मिळवून देणार असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदक मिळालेले डीआयजी दर्जाचे अधिकारीही इंगळेकडे काम करून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केलेले आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे. उपजिल्हाधिकारी, अबकारी कर या खात्यातील बदल्या करून देण्याचीही तयारी इंगळे याने दाखवली होती. कोणाला पोलिस प्रशिक्षण केंद्रातून मालेगाव हवे होते तर कोणाला सोलापूरमधून नगरला यायचे होते, अशी काही पदस्थापनाही यात दाखविण्यात आली आहे. औरंगाबादच्या एका पोलिस उपअधीक्षकाला जत येथे जायचे होते. हिंगोली येथील एका अबकारी खात्यातील अधिकाऱ्याला सोलापूर येथे नियुक्ती हवी होती. तो अधिकारी इंगळेला 50 लाख रुपये द्यायला तयार होता. याशिवाय या बदल्यांसाठी त्याने 40 ते 50 लाख रुपयांचा रेट सांगितल्याचाही यात उल्लेख आहे.  

अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन आयुक्त संदीप बिष्णाई यांची पोस्टिंग नवी मुंबई येथे, लाचलुचपत विभागाचे बिपीनकुमार सिंग यांची बदली पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय वर्मा यांची नियुक्ती ठाण्याच्या आयुक्तपदी, विनय चौबे यांची नियुक्ती पुण्याच्या आयुक्तपदी झाल्याचाही दावा इंगळे करत होता. मात्र या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्याच्या दाव्याप्रमाणे झाले नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. ही चार नावे मलिक यांनी वाचून दाखवली होती. इतर 29 नावे मात्र मलिक यांना वाचून दाखवली नाहीत. मात्र सोशल मिडियात रश्मी शुक्ला यांचे पत्र या नावासह जसेच्या तसे फिरत आहेत.

फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील संपूर्ण माहिती, पुरावे आज एका सीलबंद लिफाफ्यात आपण केंद्रीय गृहसचिवांना दिले असून, या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिले आहे. आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकार तशी चौकशी करू शकते, असे आपले मत आहे. असे असले तरी याप्रकरणी वेळ आली तर आम्ही न्यायालयात जाऊ, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 25 ऑगस्ट 2020 पासून हा अहवाल का दडवून ठेवला, तत्कालिन पोलिस महासंचालकांनी सीआयडी चौकशीची शिफारस केली असताना ती का होऊ दिली नाही. कुणाचे बिंग फुटण्यापासून सरकार घाबरत होते. माझी माहिती आहे की, यातील काही संवाद स्वत: मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऐकले आहेत. यातील दूरध्वनी संवादाबाबत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी ही प्रक्रिया प्रचलित नियमाप्रमाणे अतिरिक्त मुख्य सचिवांकडून परवानगी घेऊनच केली आहे. अशा घटनांनी देशातील सर्वोत्तम पोलिस दलाची प्रतिमा मलिन होते आहे. पोलिसच बॉम्ब ठेवतात, खंडणी गोळा करतात किंवा थेट गृहमंत्र्यांविरूद्ध आरोप करतात. अशी स्थिती महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नाही. या परिस्थितीतून महाराष्ट्र पोलिस दलाला बाहेर काढावेच लागेल.

  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख