कोरोनामुक्त झाल्याने भाजप आमदारावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण  - With the release of Korona, BJP MLA was showered with flowers with the help of JCB | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुक्त झाल्याने भाजप आमदारावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

जेसीबीच्या सहाय्याने आमदार पडळकर यांच्यावर विविध फुलांनी उधळण करत घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या स्वागतासाठी  झेंडू, आष्टर, गुलाब, गुलछडी, शेवती अशा  विविध  100 हून अधिक पोती फुलांचा वापर केला.

पंढरपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यांना काल येथील हॅास्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने विविध फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. पावसाळी अधिवेशन दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते पॅाझिटीव्ह आले होते. त्यानंतर ते पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. योग्य उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

आमदार पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी गुलाब फुलांचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन केले. तर  बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, धनगर आरक्षण समन्वय समितीचे सदस्य प्रा. सुभाष मस्के, संजय माने यांनी चक्क जेसीबीच्या सहाय्याने आमदार पडळकर यांच्यावर विविध फुलांनी उधळण करत घोषणा दिल्या. त्यांच्या स्वागतासाठी  झेंडू, आष्टर, गुलाब, गुलछडी, शेवती अशा  विविध  100 हून अधिक पोती फुलांचा वापर केला. रुग्णालयाच्या वतीनेही त्यांना पुष्पगु्च्छ देवून त्यांचा सत्कार कऱण्यात आला.

यावेळी आमदार पडळकर म्हणाले, कोरोना मुक्त झाल्याचा मला फार मोठा आनंद झाला आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते आणि गोरगरीब जनतेचे आशीर्वाद मिळाल्याने मी लवकर बरा झालो आहे. लोकांच्या सेवेसाठी माझे संपूर्ण आयुष्य मी समर्पित केले आहे. कार्यकर्त्यांनी यापुढच्या काळात सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे, असे आवाहन ही त्यांनी केले.

त्यांच्या मुळगाव असलेल्या  झरे (ता. आटपाडी जि,. सांगली) गावाकडे जाताना ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोर्टी येथील ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण केली. येथील कार्यकर्त्यांनी आमदार पडळकर लवकर बरे व्हावेत, यासाठी महादेवाला शंभर नारळाचे धोरण बांधण्याचे नवस केले होते. ते नवसही आमदार पडळकर यांच्याहस्ते मंदिरात नारळाचे तोरण बांधून पू्र्ण केले. यावेळी  संजय माने, रामभाऊ मिसाळ, अस्लम शेख, चेतन हाके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख