नाणारमधील जमीन व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक : नीलेश राणे

राणे यांच्या आरोपानंतर खळबळ
nilesh rane ff.jpg
nilesh rane ff.jpg

रत्नागिरी ः नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे व्यवहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावस भाऊ संचालक असलेल्या कंपनीमार्फत झाले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेने या प्रकल्पाला प्रथम विरोध केला. त्यांच्याच आशीर्वादाने नाणारमध्ये परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आणि आता शिवसेनाच रिफायनरी प्रकल्प आणेल, असा दावाही त्यांनी केला. 

येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाला. नाणार विषय संपला असे शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार सांगत आहेत. ही स्थानिकांची दिशाभूल असून रिफायनरी कंपनीकडून मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. त्या रायगडसाठी नव्हे तर नाणारसाठीच आहेत. रिफायनरीसाठी सुगी डेव्हलपर्स नावाच्या कंपनीने परप्रांतीयांशी भागिदारी करत जागा खरेदी केली आहे. या कंपनीचे संचालक मुख्यमंत्री ठाकरे यांचे मावस भाऊ निशांत देशमुख हे आहेत. 1400 एकर जमिनीचे खरेदी व्यवहार 17 विविध लोकांशी केले आहेत. कोरोनातील लॉकडाउनमुळे सध्या त्यांची कार्यालये बंद आहेत. मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकच नाणार जमिनीच्या व्यवहारात असतील तर तो प्रकल्प बंद करण्याचे फक्‍त नाटक सुरू आहे. सुरवातीला विरोध दाखवायचा, लोकांना भडकावायचे आणि नंतर प्रकल्प आणायचे हा शिवसेनेचा जुनाच उद्योग आहे.


रिफायनरीसाठीच्या जमिनी परप्रांतीयांना देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचेच पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप करून राणे म्हणाले, या प्रकल्पाला लागणारी 8 हजार हेक्‍टर जमीन शिवसैनिकांनी सहमतीपत्रे देऊन परप्रांतीयांच्या घशात घातली. पुण्याच्या एका कंपनीकडून अशाच प्रकारे 900 एकर जमीन परप्रांतीयांना दिल्या आहे. यामध्येही शिवसैनिकांनीच मदत केली होती. उपळे गावातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पैसे कमवण्यासाठी जमिनीला स्वतःचे कुळ लावून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पाला अजून दोन हजार हेक्‍टर जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता प्रकल्पाचे फक्‍त ऍग्रीमेंट करणे बाकी आहे. पराकोटीचा विरोध केल्यामुळे शिवसेना सरळ मार्गाने हा प्रकल्प आणू शकत नाही. त्यासाठी वेगळा फंडा राबवण्यात येत आहे. जे एन्‍रॉनचे झाले तेच रिफायनरीचे होईल. चर्चांची माहिती गल्लीतील शिवसेनेच्या खासदारांना कशी समजणार, असा टोलाही त्यांनी लगावला. 

बंद सातबाऱ्यावरील जमिनीची विक्री 

राजापूर तालुक्‍यातील गोवळ, बारसू, सोलगाव एमआयडीसीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची पॉवर ऑफ एटर्नी घेऊन बंद सातबाऱ्याच्या जमिनींची विक्री केली. त्या जमिनीची विक्री करण्यास परवानगी नसते. या विषयासंदर्भात प्रांताकडे तक्रार दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. तक्रारीनंतरही जमिनीचे व्यवहार सुरू होते, असा आरोप नीलेश राणे यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com