मुख्यमंत्र्यांचा गणपती संजय राठोडांना पावणार का?  

राठोड यांनीही आज एका कार्यक्रमात बोलताना, नो बॉलवरच माझी विकेट गेली, अशी खंत व्यक्त केली होती.
 Chhagan Bhujbal, Nitin Raut Uddhav Thackeray, Sanjay Rathore. jpg
Chhagan Bhujbal, Nitin Raut Uddhav Thackeray, Sanjay Rathore. jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी भेट देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. ठाकरे यांनी सरकारमधील आपल्या सगळ्याच सहकारी मंत्र्यांना गणरायाच्या दर्शनासाठी आमंत्रण दिले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी बुधवारी वर्षावर हजेरी लावत मुख्यमंत्र्यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. (Sanjay Rathores visit to Chief Minister Uddhav Thackerays residence) 

दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, परिवहन मंत्री अनिल परब, राज्य गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (ता. १६ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी माजी वनमंत्री संजय राठोड ही उपस्थित होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात राठोड यांच्या मंत्रिमंडळ वापसीची चर्चा सुरु झाली आहे. राठोड यांनी राज्यातील बंजारा समाजाचे मेळावे घेत त्या दृष्टीने अप्रत्यक्ष दबावही टाकायला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राठोडांना पुन्हा मंत्रीपदाची संधी केव्हा देतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना भेटीचे आमंत्रण दिलेले असताना संजय राठोडांच्या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राठोड अडचणीत आले होते. त्यावरुन मोठे राजकीय वादळ उठल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसांना जबाब देताना 'आमचा कोणावरही संशय नाही,' असे सांगितले होते. त्यानंतर राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगली होती. 

राठोड यांनीही आज एका कार्यक्रमात बोलताना, नो बॉलवरच माझी विकेट गेली, अशी खंत व्यक्त केली होती. यावेळी मीडिया ट्रायलचे ते शिकार झाले असल्याचेही राठोड यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. वृत्तपत्राच्या छापील बातमीवर अजूनही सामान्यांचा विश्वास आहे. त्यामुळे ही विश्वासार्हता टिकून राहायली पाहिजे, असेही राठोड म्हणाले होते.  

दरम्यान, आता परत मला मंत्रीपद द्यायचे की नाही हा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मात्र, माझ्या समाजासाठी मी काम करत राहणार, असे राजीनामा देताना राठोड यांनी सांगितले होते. त्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने राठोड यांनी मंत्र्यांसोबत वर्षा निवास्थानी हजेरी लावल्याने पुन्हा त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.       

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com