भाजपच्या पाठिंब्यासाठी 'या' अपक्ष आमदारावर रश्मी शुक्ला यांनी आणला होता दबाव.. - Rashmi Shukla had put pressure on independent MLA to support BJP | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या पाठिंब्यासाठी 'या' अपक्ष आमदारावर रश्मी शुक्ला यांनी आणला होता दबाव..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी दबाव आणून भाजपला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केला होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅंपिंग प्रकरण सध्या खूपच गाजत आहे. रोज नवीन खुलासे होत आहेत. असाच एक खुलासा राष्ट्रवादी कॅाग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत टि्वट करून पुरावा दिला आहे. 

2019च्या निवडणुकीत शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी दबाव आणून भाजपला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केला होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आपल्या टि्वटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, "शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.अजून पुरावे काय पाहिजेत."

"रश्मी शुक्ला यांनी आपल्या पत्रात काही ज्येष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांची बदल्यांच्या घोटाळ्यामध्ये नावे घेतली आहेत. त्यातील काही संतप्त अधिकारी सरकारला निवेदन देणार आहेत व अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार.पोलीस दलामध्ये या अहवालावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत," असे टि्वट काल जितेंद्र आव्हाड यांनी केलं होते. 

हेही वाचा : रश्मी शुक्लांच्या काळातील पुण्याच्या 'त्या' प्रकरणाची पुन्हा चर्चा!
 
पुणेः राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपींगच्या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्‍मी शुल्का यांच्यावर गंभीर आरोप सत्ताधारी पक्षातील मंत्री करत आहेत. त्यानिमित्ताने रश्‍मी शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी त्यांच्या नावाने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. यामध्ये शुक्ला यांनी पीआय धुमाळ यांना निलंबित केले होते.  आयपीएस (IPS) अधिकारी के. के. पाठक सेवानिवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांच्याकडे पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची (Pune Police) सूत्रे आली होती. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. या पहिल्याच बैठकीत ‘ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, भ्रष्टाचार होत असेल, तर त्याला पोलिस निरीक्षक जबाबदार असेल’ असा दम भरला होता.यामुळे शहरात पोलिसांसाठी आनंददायी नाही पण नागरिकांसाठी तरी खुशालीचे वातावरण निर्माण होईल असे वाटले होते. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी घेऊन थेट माझ्याकडे यावे असे आवाहन करत त्यांचा मोबाईल क्रमांक भर कार्यक्रमांमधून पुणेकरांसमोर जाहीर केला होता. त्यामुळे आयुक्त शुक्लांबद्दल अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आयुक्तालयात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह, व्यावसायिक, जमीनदार यांची गर्दी वाढायला लागली होती. त्यांची दखल घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना शुल्का यांच्याकडून दिले जात होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख