फडणवीसांना रश्मी शुक्लांनीच दिला 'तो' 6.3 जीबी डेटा? कुंटेच्या अहवालातून संकेत

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या डेटामध्ये अनेक पोलिस अधिकारी, राजकीय नेते यांची नावे आहेत.
Rashmi Shukla gave data to Fadnavis indications in sitaram kuntes report
Rashmi Shukla gave data to Fadnavis indications in sitaram kuntes report

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा मुद्दा थेट केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मांडला आहे. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुल्का यांचा अहवाल त्यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे सादर केला आहे. त्यासोबत 6.3 जीबीचा डेटा असलेला पेन ड्राईव्हही त्यांनी दिला आहे. या पेनड्राईव्हमध्ये फोन टॅपिंगशी संबंधित सर्व माहिती असल्याचा दावा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला होता. 

फडणवीस यांनी दिलेल्या डेटामध्ये अनेक पोलिस अधिकारी, राजकीय नेते यांची नावे आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य, संवेदनशीलता लक्षात घेता यातील केवळ पत्रव्यवहार आपण उघड करीत आहोत. अधिक तपशील उघड करणार नाही. यातील गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. हा गोपनीय अहवाल फडणवीस यांच्याकडे आला कुठून यावरून सत्ताधारी नेत्यांनी सवाल उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांना मी मिळवला अहवाल, असे सांगत आपल्यावर गुन्हा दाखल करा, असे आव्हान दिले. 

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फोन टॅपिंगबाबत राज्य शासनाला काल अहवाल सादर केला आहे. यामध्ये कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांनी सरकारची दिशाभूल करून आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन टॅप केल्याचे म्हटले आहे. त्याबाबत त्यांनी माफीही मागितल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालासोबत कोणताही पेन ड्राईव्ह नव्हता, असेही कुंटे यांनी अहवालात म्हटले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याकडील 6.3 जीबी डेटा कुठून आला, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. 

काय म्हटले आहे कुंटे यांच्या अहवालात?

तत्कालीन पोलीस महासंचालकांनी 25 अॉगस्ट 2020 रोजी सादर केलेला रश्मी शुक्ला यांचा अहवाल प्रसार माध्यमातून उघड झाल्याचे दिसते. त्यासोबतच काही पेन ड्राईव्हवरील डेटा उघड झाल्याची बाब पुढे आली आहे. मात्र शासनाला जेव्हा पोलीस महासंचालकांनी अहवाल पाठविला त्यासोबत पेन ड्राईव्ह नव्हता. उघड झालेल्या अहवालाची प्रत पाहता (संलग्न) ती रश्मी शुक्ला यांच्याकडे असलेल्या अॉफीस कॉपीची प्रत असल्याचे सकृत दर्शनी दिसते. त्यावरून ही प्रति त्यांचेकडूनच उघड झाली असावी असा संशय येतो. सदर पत्र टॉप सिक्रेट असताना देखील उघड करण्यात आली ही बाब गंभीर आहे. संशय असल्याची बाब सिध्द झाल्यास त्या कठोर कारवाईस पात्र ठरतील, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपावर राष्ट्रवादीने उत्तर दिले असून तत्कालीन पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदा फोन टॅपिंग केले आणि रॅकेट वगैरे काही नव्हते, असे सांगत बदल्या या पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच केला होता. तसेच शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत. सरकार स्थापनेवेळी त्यांनी अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com