ramraje naik nimbalkar focused on sanjivarajes mlc post | Sarkarnama

रामराजेंना जे जावयाच्यावेळी जमले, ते आता भावाच्यावेळी जमणार कां?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

जीवराजे अनेक वर्षापासून सातारा जिल्हा परिषदेत आहेत. फलटण तालुक्याच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येण्याची त्यांची ख्याती आहे. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षही होते. त्यांचे सहकारातही मोठे काम आहे. त्यांचा बायोडाटा स्ट्राँग असल्याने त्यांना आमदार करण्यासाठी रामराजेंची धडपड आहे.

पुणे: सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना आता चुलत बंधू संजीवराजेंना आमदार करण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शब्द टाकला आहे. यासंबंधाने शरद पवार काय निर्णय घेतात, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. 

रामराजे यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून ते सातत्याने सत्तेत आहेत. 1995 ला ते अपक्ष आमदार झाले. त्यावेळी त्यांनी पाणीप्रश्न सोडवण्याच्या अटीवर युती सरकारला पाठिंबा दिला होता. युतीने त्यांना कृष्णा खोरे महामंडळ दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्विकारले. त्यानंतर 15 वर्षे सत्तेच्या काळात रामराजेंना सुरवातीच्या काळात राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेटमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2014 ला सत्ता गेल्यानंतर काही दिवसांतच ते विधान परिषद सभापती झाले. त्यामुळे 1995 ते 2020 यादरम्यान काही अवधी सोडला तर ते नेहमी सत्तापदावर राहिले आहेत.

पंचवीस वर्षे एवढी सत्ता मिऴवलेल्या रामराजेंनी तसे आपल्या फलटण भागावर वर्चस्व ठेवले आहे. फलटणच्या पाणी प्रश्नी महत्वाची भुमिका निभावून सहकार कृषी क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. याकामी संजीवराजे आणि रघुनाथराजे या बंधूंनी त्यांना महत्वाची साथ दिली आहे. संजीवराजे हे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे तर रघुनाथराजे हे नगरपालिका, बाजार समितीचे राजकारण बघतात. फलटणबरोबरच जिल्ह्याच्या अन्य भागात रामराजेंचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना अनेक वर्षे साताऱ्याचे पालकमंत्रीपद भुषवण्याची संधी मिळाली. 

रामराजे हे फल़णमधून निवडून येत, मात्र 2009 मध्ये फलटण मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाला. त्यामुळे त्यांना विधानसभेवर निवडून जाता आले नाही. मात्र शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर घेवून मंत्री केले. 2009 पासून ते काही अवधी सोडला तर विधान परिषदेवर आहेत. त्यांची मुदत 2022 ला संपणार आहे. रामराजेंनी 2014 ला जावई राहूल नार्वेकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार केले होते. राहूल नार्वेकर हे पुर्वी शिवसेनेत कार्यरत होते. ते प्रवक्ते होते. मात्र 2014 च्या लोकसभेला ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीने त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला. पण पराभव झाल्यानंतर महिनाभराच्या आत राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर घेतेले होते. हे नार्वेकर 2019 च्या विधानसभेला आमदारकीचा राजीनामा देवून भाजपमध्ये गेले. त्यांना भाजपने तिकीट दिले, ते आता मुंबईतून आमदार झाले आहेत. 

आता राज्यपालनियुक्त आमदारपदासाठी त्यांनी बंधू संजीवराजे यांचे नाव पुढे केले आहे. संजीवराजे अनेक वर्षापासून सातारा जिल्हा परिषदेत आहेत. फलटण तालुक्याच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येण्याची त्यांची ख्याती आहे. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षही होते. त्यांचे सहकारातही मोठे काम आहे. त्यांचा बायोडाटा स्ट्राँग असल्याने त्यांना आमदार करण्यासाठी रामराजेंची धडपड आहे. याकडे शरद पवार कसे पाहतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख