अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी रामदास आठवलेंचे पंतप्रधान मोदींना पत्र...  - Ramdas Athavale letter to PM Modi to help those affected by heavy rains | Politics Marathi News - Sarkarnama

अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी रामदास आठवलेंचे पंतप्रधान मोदींना पत्र... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन; कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिले आहे. 

मुंबई : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने महापूर येऊन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी आणि चिखल साचल्याने पुढील रब्बी पिकांचा हंगाम ही वाया जाणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीने शेतकरी शेतमजुर पूर्ण उध्वस्त झाले आहे. त्यांना मदत देण्यासाठी, पुन्हा  शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी तात्काळ मदत देण्यात यावी, यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन; कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहिले आहे. 

रामदास आठवले लवकरच केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

अतिवृष्टीने पूल कोसळले आहेत. त्यासोबत शेतकरी शेतमजूर सुद्धा मनातून कोसळले आहेत. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारने अद्याप मदत दिलेली नाही. एनडीआरएफच्या माध्यमातून एकरी 37 हजाराची मदत मिळत आहे. ती केंद्र सरकारचीच मदत आहे. 

अतिवृष्टीत जीवित हानी झालेल्या कुटुंबाला सांत्वनपर केवळ 4 लाख रुपये राज्य शासन देत असून ती रक्कम अत्यल्प आहे. त्यात वाढ करून किमान 10 लाख रुपये सांत्वनपर निधी अतिवृष्टीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना द्यावा, त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र पाठवीत आसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे. पंढरपूर मध्ये चंद्रभागा नदी किनारी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.  

रामदास आठवले यांनी नुकताच अतिवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. बारामती; फलटण; पंढरपूर आणि आटपाडी दिघांची येथे पूरग्रस्त अतिवृष्टी बधितांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आटपाडी जिल्हा सांगलीत विविध गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीग्रस्तांचा पाहणी दौरा करून आल्यानंतर रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देऊन अतिवृष्टीग्रस्तांना नवजीवन देण्याची मागणी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख