खडसेंनी  'राष्ट्रवादी'त जाऊ नये.. त्यांनी 'रिपब्लिकन'मध्ये यावं.. - Ramdas Athavale invitation to Eknath Khadse to join the Republican Party | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंनी  'राष्ट्रवादी'त जाऊ नये.. त्यांनी 'रिपब्लिकन'मध्ये यावं..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

रामदास आठवले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आमंत्रण दिलं आहे. 

मुंबई : "एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राज्यात भाजपला मजबूत केले. आता त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये जाऊन उपयोग नाही, आता या मंत्रिमंडळात जागा शिल्लक नाही. त्यापेक्षा त्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे. आपण मिळुन महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून बाहेर खेचू आणि आपले सरकार आणू," असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आठवले बोलत होते. यापूर्वी शिवसेनेचे नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता रामदास आठवले यांनी त्यांना रिपब्लिकन पक्षात येण्याचे आमंत्रण दिलं आहे. 

खडसे यांच्या पक्षांतरासाठी काहींनी दहा आॅक्टोबर रोजी सकाळी दहाचा मुहूर्त शोधून काढला आहे. प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. खडसेंच्या या संभाव्य हालचालींबद्दल भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले की भाजपला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे खडसे यांनी या स्थितीत भाजप सोडू नये. आता महाजन यांचे हे आवाहन खडसे मनावर घेणार का की गेल्या काही दिवसांची भाजप विरोधातील खदखद प्रत्यक्षात आणणार, यावर येत्या दोन-तीन दिवसांतच निकाल लागण्याची शक्यता आहे.

खडसे काल सहकुटुंब मुक्ताईनगर येथून मुंबईत दाखल झाले आहेत.आज ते शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे.या बाबत खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''भाजपची उदया कार्यकारिणीची निवड बैठक आहे. त्यासाठी आपण मुंबईत आलो आहोत.''का आहेत खडसे नाराज?खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली आहे. याच पार्शवभूमीवर ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीही त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुंबईत जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंचा राजीनामा घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केल्यावर खडसेंनीही या जमिनीची खरेदी पत्नी व जावयाने केली आहे, ती नियमानुसारच असल्याचा दावा केला होता. आपल्यावरील अन्यायाबाबत चार वर्षांपासून घरातच धुणी धुतोय, पक्षातच नाराजी व्यक्त करतोय, तिकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी रस्त्यावर उतरलो, असे खडसे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख