Ram Janmabhoomi agitation like freedom struggle says Narendra Modi | Sarkarnama

#Ayodhya स्वातंत्र्यलढ्यासारखेच रामजन्मभूमीचे आंदोलन : नरेंद्र मोदी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

प्रभू राम यांच्यासारखा नीतीवान राज्यकर्ता झाला नाही, अशा शब्दांत मोदी यांनी अभिवादन केले. 

अयोध्या : देशाच्या स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच रामजन्मभूमीमुक्तीसाठीचे आंदोलन झाले. अयोध्येत राममंदिर उभे राहत असल्याने कोट्यवधी रामभक्तांसाठी हा आजचा आनंदाचा दिवस आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अयोध्येत उभे राहणारे हे मंदिर भारताचे आधुनिक प्रतिक बनेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी प्रभू श्रीराम आणि भारतीय संस्कृतीचे नाते सांगितले. सियावर रामचंद्र की जय, जय सियाराम अशा घोषणांनी मोदींनी आपल्या  भाषणाची सुरवात. या जयघोषाचा प्रतिध्वनी संपूर्ण जगभर पसरला आहे. कोट्यवधी रामभक्तांना आज मोठा आनंद होत आहे. या भूमिपूजनासाठी मला निमंत्रित करणे हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्टी आहे. त्यामुळे रामजन्मभूमी ट्रस्टचा मी आभारी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

भारत आज सुवर्णअध्याय लिहित आहे. आज संपूर्ण भारत राममय आहे. देश रोमांचित, भावूक आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपली आहे. आपल्या जिवंतपणी हे स्वप्न साकार होईल, असे कोट्यवधी लोकांना वाटत नव्हते. देशात स्वातंत्र्य आंदोलनासाठी संपूर्ण देश प्रयत्नशील होता. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून स्वातंत्र्यासाठीचा हुंकार निघत होता. त्यांच्या या लढ्याचे परिमार्जन  15 आॅगस्ट रोजी झाले. हा दिवस देशासाठी महत्त्वाचा ठरला. स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच आजचा पाच आॅगस्ट हा दिवस संकल्प व त्याग यांचे प्रतिक आहे. स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच कोट्यवधी लोकांनी रामजन्मभूमीसाठी सहभाग घेतला. या सर्व सहभागी झालेल्यांना मी 130 कोटी देशवासियांच्या वतीने अभिवादन करतो. रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडला गेलेला प्रत्येक जण आज भावनाप्रधान झाला आहे. प्रभू राम आपल्या मनात मिसळून गेले आहेत. कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते आणि ती भविष्यातही मिळत राहील, असे मोदी यांनी सांगितले.

श्रीरामाचे हे मंदिर आपल्या संस्कृतीचे आधुनिक प्रतिक बनेल. भारतीयांची शाश्वत आस्था, राष्ट्रीय आस्था आणि सामूहीक शक्तीचे प्रतिकही ते असेल. हे मंदिर तयार झाल्यानंतर अयोध्येचे पूर्ण अर्थकारण बदलून जाईल. नव्या संधी निर्माण होतील. सर्व जगातून लोक राम व सीता यांच्या दर्शनासाठी येतील. आजचा ऐतिहासिक क्षण युगानयुगे भारताची दिव्य पताका फडकवत राहील. करोडो रामभक्तांसाठी न्यायप्रिय भारताची ही भेट आहे. राम हे मर्यादा पुरुषोत्तम असल्याने त्यानुसार त्यांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आहे. कोरोनाच्या संकटात सर्व मर्यादा पाळून हा कार्यक्रम होत आहे. राममंदिर खटल्याचा निकाल सर्वाच्च न्यायालयाने दिला तेव्हा देखील भारतीय जनतेने मर्यादा दाखवून दिली होती, अशी आठवण त्यांनी या निमित्ताने करून दिली.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख