आता खडसे विरूद्ध खडसे सामना रंगणार - Raksha Khadse leader of BJP OBC | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आता खडसे विरूद्ध खडसे सामना रंगणार

कैलास शिंदे
शुक्रवार, 25 जून 2021

रोहिणी खडसे भारतीय जनता पक्षाच्या विरूद्ध अधिक आक्रमक झाल्या आहेत.

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भारतीय जनता पक्षाचे ओबीसी नेतृत्व रिक्त आहे, त्यात आता खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आक्रमक झाल्या आहेत, अशा स्थितीत भाजपनेही त्यांचा सामना करण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांचे नेतृत्व पुढे आणण्याची खेळी सुरू केली आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सोबत त्यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर एकनाथ खडसे  आक्रमक आहेतच पण त्यांच्यापेक्षा रोहिणी खडसे भारतीय जनता पक्षाच्या विरूद्ध अधिक आक्रमक झाल्या आहेत. ट्विटरवर त्या राज्यातील भाजप नेत्यांवर सडकून टीका करीत आहेत.

दोघांच्या आक्रमणाचा पक्षाचे नेते गिरीश महाजन सामना करीत आहेत. मात्र, त्यांना राज्यातील लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे आता भाजपने खासदार रक्षा खडसे यांना पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. रक्षा खडसे यांनी राजकारणाचे धडे एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहेत. त्यामुळे राजकारणातील डावपेच त्यांनाही माहित झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून त्या आपली राजकीय चुणूक दाखवीत आहेत.

देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्यात टोकाचा वाद आहे. परंतु फडणवीस मुक्ताईनगर येथे आल्यानंतर त्यांनी त्यांना आपल्या निवासस्थानी स्वागत करून आपण नाते आणि पक्ष यांची गल्लत करीत नाही हेच चाणाक्षपणे अधोरेखित करून दिले. तेथेच त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागा रद्द झाल्यास  भाजपतर्फे ओबीसी उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. त्यावर रोहिणी खडसे यांनी उत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?....आता गळा काढण्यात अर्थ नाही.  

रोहिणी खडसे यांनी ट्विट करून फडणवीस यांना धारेवर धरल्यामुळे भाजप काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले होते. दुसरीकडे त्यांच्या भावजय भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नेतत्वाखाली उद्या ओबीसी आरक्षण रद्द करू नये, या मागणीसाठी जळगावात चक्का जाम आंदोलन आहे. रक्षा खडसे या भाजपतर्फे आयोजित ओबीसी बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होत्या. त्यांना भाजप ओबीसी चेहरा म्हणून पाहत आहे. ओबीसी आरक्षणावरुन या दोघी आता समोरासमोर आल्या आहेत. 

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. भाजपने ओबीसी चेहरा म्हणून खासदार रक्षा खडसे यांच्याकडे नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात उद्या आंदोलन होणार आहे.  रक्षा खडसे यांनी प्रथमच आपल्या नणंद रोहिणी खडसे यांना कडक राजकीय उत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात खडसे विरूद्ध खडसे हा सामना होणार मात्र यातून अँड. रोहिणी खडसे व रक्षा खडसे यांचे नवे नेतृत्व पुढे येणार काय हे काळच ठरवेल.
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख