बारा आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टी म्हणाले...

त्यामुळे बाकी कोणत्याही चर्चेत मला रस नाही.
बारा आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर राजू शेट्टी म्हणाले...
Raju Shetty said after name removed from the list of 12 MLAs

मुंबई : विधान परिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची काल भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादीतील काही नावांवर राज्यपालांनी आक्षेप घेतल्याची चर्चा असून त्यात ईडीकडून चौकशी सुरू असलेले एकनाथ खडसे आणि विविध आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राजू शेट्टींच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून शेट्टी यांचे नाव मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यावर शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Raju Shetty said after name removed from the list of 12 MLAs )

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी हे सध्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पदयात्रा काढत आहे. सरकारने या पूरग्रस्तांना मदत करावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. 

नाव मागे घेण्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भात गेल्या सव्वा वर्षात माझी कोणाबरोबर चर्चा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत माझी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यावेळी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या दोन जागा द्याव्यात, अशी मागणी केली होती. लोकसभेच्या दोन जागांऐवजी राष्ट्रवादीच्या कोट्यातील विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे त्यावेळी कबूल केले होते. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विधान परिषदेसाठी राज्यपालांना नावे सूचविण्याची वेळ आली, तेव्हा सव्वा वर्षापूर्वी शरद पवारांनी मला बारामतीला बोलावून याबाबत सांगितले होते. स्वाभिमानीला जी जागा राष्ट्रवादी देणे लागत होती, ती जागा आम्ही आता देत आहेत. भाजपच्या विरोधात सभागृहात महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी ही जागा तुम्ही स्वतः स्वीकारावी, अशी विनंती पवारांनी त्यावेळी मला केली होती, असेही शेट्टी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पवारांच्या त्या भेटीनंतर गेल्या सव्वा वर्षात या विषयावर मी कोणाबरोबरही चर्चा केलेली नाही. कोणालाही भेटलेलो नाही अथवा कोणाला दूरध्वनीसुद्धा केलेला नाही. तसं घडलं असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं की राजू शेट्टी यांनी माझ्याबरोबर या विषयावर चर्चा केली आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीकोनातून विधान परिषदेची जागा महत्त्वाची नाही. जे देणं लागत होतं, ते देण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची होती. द्यायचं काही नाही द्यायचं, हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. तो काय आमच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. सध्या आम्ही पूरग्रस्तांना न्याय द्यावा; म्हणून आंदोलन करतो आहोत. या आंदोलनात आम्ही व्यस्त आहोत, त्यामुळे बाकी कोणत्याही चर्चेत मला रस नाही.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.