मुकेश अंबानींच्या कार्यालयावर राजू शेट्टी काढणार मोर्चा.. - raju shetty morcha at mukesh ambani office agriculture act | Politics Marathi News - Sarkarnama

मुकेश अंबानींच्या कार्यालयावर राजू शेट्टी काढणार मोर्चा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर येत्या २२ डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले. 

पुणे : देशातील काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवे कृषी कायदे केले आहेत. या कायद्यांचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.

केंद्र सरकारच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर येत्या २२ डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले. 

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी पुण्यात पत्रकारांशी  संवाद साधला. शेट्टी म्हणाले, "२२ डिसेंबरला वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफीसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव देखील सहभागी होणार आहेत."वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. 

शेतकरी संघटनांना नोटीस 

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना नोटीसा बजावल्या आहेत. रस्ता रोखणाऱ्यांची नावे मागवली आहेत. 
केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांना खरंच काही द्यायचं असेल तर हमीभाव द्या. उगाच त्यांच्यावर नको असलेले कायदे लादू नका", अशी मागणी  राजू शेट्टी यांनी यावेळी केली. यासोबतच मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही एकत्र असल्याचं त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणतात, शेतकरी आंदोलन हा तर पूर्वनियोजित कट...
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा 21 वा दिवस असून, शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकार मागण्या मान्य करीत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, भाजपचे नेते  चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल धक्कादायक दावा केला आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणी करीत दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी 26 नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि चिल्ला या सीमांवर हे आंदोलन सुरू आहे. यात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांतील शेतकरी सहभागी आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख