राज ठाकरेंचे आता पुण्यात 'मनसे' लक्ष! - Raj Thackeray to Visit Pune 3 Days a Month For Review Work   | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरेंचे आता पुण्यात 'मनसे' लक्ष!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जुलै 2021

ज्या शाखेचा अध्यक्ष जोमाने चांगले काम करेल, त्याच्या घरी मी स्वतः जेवायला येईन. 

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे राज्यातील विविध शहराच्या दौरा करत आहेत. ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकचा दौरा केला. त्या ठिकाणी मनसेची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नाशिकच्या दौऱ्यानंतर ठाकरे हे काल (ता. १९ जुलै) सकाळी पुण्यात दाखल झाले होते. ते तीन दिवस पुण्यात असणार आहेत. (Raj Thackeray to Visit Pune 3 Days a Month For Review Work) 

यापूर्वीच्या प्रभाग अध्यक्षांची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना संधी दिल जाणार आहे. ज्या शाखेचा अध्यक्ष पक्षाचे काम अधिक जोमाने चांगल्या पद्धतीने करेल, त्या शाखेच्या अध्यक्षाच्या घरी जेवयाला जाणार आहोत. तसेच, मी महिन्यातील तीन दिवस पुण्यात येऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहे, असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा : मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी. पाडवींचा फडणवीसांना इशारा

ज्या शाखेचा अध्यक्ष जोमाने चांगले काम करेल, त्याच्या घरी मी स्वतः जेवायला येईन, अशी कार्यकर्त्यांना हवीहवीशी संधी उपलब्ध करून देत राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष वाढीचे काम अधिक जोमाने करण्याचा सल्ला दिला.   

पुण्यात दाखल होताच त्यांनी शहरातील सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकारी चार्ज व्हावेत, यासाठी राज ठाकरे यांनी एक आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही कार्यकर्त्याची  आपला नेता आपल्या घरी जेवायला यावा, अशी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याची संधी राज यांनी आपल्या मनसैनिकांसाठी खुली केली आहे.

हेही वाचा : सरकार पडेल असे रोज सकाळी वाटतं पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

दरम्यान, राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये ५० जणांचा समावेश आहे. हे पथक पुणे शहरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काम करणार आहे. पावसामुळे किंवा इमारत दुर्घटनेसारख्या घटनांमुळे नागरिकाच्या मदतीसाठी मनसे धावून जाणार आहे. याचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे नेते हेमंत संभूस यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख