आता राहुल गांधी यांच्यापुढे हाच शेवटचा पर्याय - Rahul Gandhi should join BJP now : Nilesh Rane | Politics Marathi News - Sarkarnama

आता राहुल गांधी यांच्यापुढे हाच शेवटचा पर्याय

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधीलच अनेकांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे.

मुंबई : ‘‘राहुल गांधींच्या जवळचे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतःच भाजपत प्रवेश करावा, हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे,’’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे सचिव नीलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. (Rahul Gandhi should join BJP now : Nilesh Rane)

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे उत्तर प्रदेशमधील नेते जितिन प्रसाद यांनी आज (ता. ९ जून) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. रेल्वेमंत्री पियूष गोयल, भाजपचे खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

माजी मंत्री राहिलेले जितिन प्रसाद यांनी पक्ष सोडणे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. कारण, पुढील वर्षभरात उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. राज्यात अगोदरच पक्षाची अवस्था तोळामासाची असताना प्रसाद यांच्या सारख्या बड्या नेत्याने पक्ष सोडणे, हे पक्षश्रेष्ठींनाही विचार करायला लावणारे आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ यावे 

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधीलच अनेकांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. त्यातूनच माजी खासदार नीलेश राणे यांनीही गांधी यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. 

यंग ब्रिगेडमधील कोणी कोणी सोडला हात 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापासून झाली होती. आता उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यंग ब्रिगेडमध्ये शिंदे यांच्यासह सचिन पायलट, मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांचा प्रामुख्याने समावेश होता.

माजी केंद्रीय मंत्री असलेले जितिन प्रसाद हे 47 वर्षांचे आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांचा 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांत पराभव झाला होता. पक्षातील फेरबदलांबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्येही प्रसाद यांचा समावेश होता.  

उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांना विश्वासात घेतले जात नव्हते. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतही त्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यांचा जिल्हा असलेल्या शहाजहानपूरमध्येही जिल्हाध्यक्षांची निवड करताना त्यांना विचारण्यात आले नव्हते. समाजवादी पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांना शहाजहानपूरमध्ये महत्व दिले जात होते. त्याचवेळी निष्ठावंत असलेल्या प्रसाद यांना डावलले जात होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख