लालूप्रसाद यादव यांच्या उजव्या हाताने राजदला केला रामराम !  - raghuvanash prasad singh resign from party sent letter to lalu prasad | Politics Marathi News - Sarkarnama

लालूप्रसाद यादव यांच्या उजव्या हाताने राजदला केला रामराम ! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

रुग्णालयातून लालूंना पाठविलेल्या पत्रात सिंह यांनी म्हटले आहे, की जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या निधनानंतर म्हणजे गेल्या 32 वर्षापासून मी आपल्यासोबत राहिलो. पक्षातील नेत्यांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम आणि स्नेह दिला

नवी दिल्ली : बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण आतापासून चांगलेच तापू लागले आहे. आयाराम-गयारामांची संख्याही वाढत असताना राजदचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे अत्यंत विश्वासू सहकारी रघुवंशप्रसाद सिंह यांनी पक्षाला रामराम केला आहे. सिंह यांनी स्वत: एक चिठ्ठी लालूप्रसाद यांना पाठविली आहे. 

सिंह यांच्या राजीनाम्यामुळे राजदला मोठा धक्का मानला जात आहे. कारण सिंह हे अनेक वर्षापासून लालूंचे विश्वासू नेते म्हणून वावरले आहेत. पक्षांने त्यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या. कॉंग्रेसच्या काळात त्यांना केंद्रात मंत्रीही करण्यात आले होते. राजधानीत लालू यांच्याप्रमाणे सिंह हे पक्षाचा किल्ला लढवित असत. लालूंविरोधात कोणी ब्र जरी काढला तरी सिंह हे त्यांचा आपल्या बिहारी स्टाईलमध्ये समाचार घेत. 

बिहारमधील निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रतीष्ठेची केली असून कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता आणण्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत. भाजप, लोक जनशक्ती पक्ष आणि जेडीयू पक्षाची आघाडी होण्याची शक्‍यता असली तरी रामविलास पासवान हे नितीशकुमारांवर काहीसे नाराज आहेत. तसे असले तरी वेळेवर काही जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि आघाडीचा धर्म पाळायचा हे पासवान यांचे राजकारण राहिले आहे. 

काही असले तरी नितीशकुमारांसमोर लालूप्रसाद यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच की काय राजदच्या ज्येष्ठ आणि नाराज नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सत्ताधारी जेडीयूने सुरू केल्याची चर्चा तेथे सुरू आहे. 

बिहारच्या यावेळच्या निवडणुकीचे दुसरे वैशिष्ठ्य असे की राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद तुरूंगात आहे. त्यामुळे या पक्षाची धुरा अर्थात त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर आहे. दुसरे पुत्र राजकारणापासून दूर गेले आहेत. काही नेते पक्ष सोडून गेले आहेत. आता ज्येष्ठ नेते आणि लालूंचे अत्यंत निकटवर्ती नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे. ते कोरोनाने गेल्या काही दिवसापासून आजारी आहेत. त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 

रघुवंशप्रसाद हे तेजस्वी यादव यांच्या कारभारावर नाराज आहेत. लालूप्रमाणे त्यांचा मुलगा नाही हा समज त्यांनी करून घेतला होता. काही महिन्यापासून ते पक्षापासून तसे दूर गेले होते. शेवटी नाराज किती दिवस राहायचे याचा विचार करून त्यांनी पक्षाकडे राजीनामा पाठविला आहे. पक्षात रामासिंह यांचा प्रवेश झाल्यापासून तर ते अधिकच नाराज झाले. सिंह हे राजपूत समाजाचे आहेत. 

रुग्णालयातून लालूंना पाठविलेल्या पत्रात सिंह यांनी म्हटले आहे, की जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या निधनानंतर म्हणजे गेल्या 32 वर्षापासून मी आपल्यासोबत राहिलो. पक्षातील नेत्यांनी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम आणि स्नेह दिला मात्र आता पक्षात माझी घुसमट होत आहे. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मला माफ करा ! 

या राजीनाम्याबाबत जेडीयूचे नेते राजीव रंजन यांनी सिंह यांचे स्वागत करताना म्हटले आहे की राजदच्या दलदलीत न राहण्याचा त्यांचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख