...मग बघतो कोण अडवतं ते? - Pune to Vidhan Bhavan organize 'Long March' for Maratha reservation : Sambhaji Raje | Politics Marathi News - Sarkarnama

...मग बघतो कोण अडवतं ते?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

हा ‘लाँग मार्च’ सरकारला परवडणारा नसेल.

कोल्हापूर : आम्ही जिल्हाजिल्ह्यांत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ बैठका, चर्चाच करतोय, असे नाही. तर त्याच दिवशी पुढील 'लाँग मार्च'ची तयारीसुद्धा करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यांत ‘लाँग मार्च’च्या तयारीसाठीसुद्धा बैठका घेणार आहोत. हा ‘लाँग मार्च’ सरकारला परवडणारा नसेल. हा ‘लाँग मार्च’ मुंबई विधान भवनावर चालून जाईल. मग बघतो कोण अडवतं ते, असे खुले आव्हान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिले. (Pune to Vidhan Bhavan organize 'Long March' for Maratha reservation : Sambhaji Raje)

सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची कोल्हापूर येथे आज (ता. १० जून) बैठक झाली. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते. येत्या १६ जूनला दहा ते एक या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मूक आंदोलन होणार आहे. आंदोलनात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक, २१८५ विद्यार्थी असणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. 

हेही वाचा : मराठा समाजाने ताकद दाखवलीय; आता लोकप्रतिनिधींनी आरक्षण कसे देणार, हे सांगावे

खासदार संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या बैठकांमध्ये आम्ही पुढील काळात काढण्यात येणाऱ्या 'लाँग मार्च'ची तयारीसुद्धा करणार आहोत. पुणे ते विधान भवन असा हा 'लाँग मार्च'असेल. पुण्याचा लाल महाल येथून मी चालण्यास सुरुवात करेन. थेट मुंबईमध्ये विधान भवनवर त्याची सांगता होईल. मराठा समाज हा कुणाही जाती, धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर तो स्वतःच्या हक्काची लढाई लढत आहे.

असे असेल १६ जून रोजीचे मूक आंदोलन
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली आहे. त्यादिवसापासून मी समाजाला एका विधायक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आज समाज नाराज आहे, म्हणून त्यांच्या भावनांशी खेळ करणे मला मंजूर नाही. त्यांना वास्तव परिस्थितीची जाणीव करून देणे, माझी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आता आंदोलनाची दिशा ठरवली आहे.

आमदार, खासदार आणि त्या जिल्ह्यातील पालकमंत्री सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने १६ जून रोजी होणाऱ्या  कोल्हापुरात मूक आंदोलनाला आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलन स्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल. एका बाजूला मी, महाराष्ट्रातील सर्व समन्वयक, समाजासाठी काम करणारे लोक आणि आमच्या समोरच्या बाजूला लोकप्रतिनिधी अशी ती बैठक व्यवस्था असेल. त्या ठिकाणी आम्ही कुणीच बोलणार नाही. तर त्या जागी लोकप्रतिनिधींनी येऊन स्वतःची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख