आजी, माजी खासदारांची श्रेयासाठी लढाई...महामार्गाचे रुंदीकरण दूरच.. - pune-nashik highway Battle for credit between Shivajirao Adhalrao Patil and Amol Kolhe | Politics Marathi News - Sarkarnama

आजी, माजी खासदारांची श्रेयासाठी लढाई...महामार्गाचे रुंदीकरण दूरच..

उत्तम कुटे
शनिवार, 5 डिसेंबर 2020

शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये पुन्हा श्रेयाची लढाई सुरु झाली आहे.

पिंपरी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणावरून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये पुन्हा श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षापासून असलेले हे काम अद्याप सुरु झाले नसल्याने तेथील कोंडी कायमच आहे. फक्त या कामाला मंजुरी मिळाली असून टेंडर प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील वर्षीच प्रत्यक्ष सहापदरी रुंदीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे शिरूरचे (जि. पुणे) खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि या मतदारसंघाचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव या दोघांनीही आपल्याच पाठपुराव्यामुळे हे काम (चांडोली टोलनाका ते मोशी टोलनाका) मार्गी लावल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न व त्यामुळे तेथे होणारी कोंडी हा प्रचाराचा मुद्दा होता. त्यामुळे निवडून आल्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. विविध स्तरावर बैठका घेतल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिष्टाई कामी आली. त्यामुळेच या कामाला केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूरी दिल्याचे खासदार कोल्हे यांनी  'सरकारनामा'ला आज सांगितले. 

भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्यात असून पुढील वर्षी मार्चमध्ये प्रत्यक्ष काम सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर तळेगाव-चाकण व पुणे -नगर या महामार्गांचे रुंदीकरण आपल्या रडारवर आहे, असे ते म्हणाले. चाकणचा तळेगाव चौक आणि एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानंतर नाशिक फाटा ते मोशी रुंदीकरणाचीही लवकर निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

दुसरीकडे आपण खासदार असताना २०१३ पासून या रुंदीकरणासाठी आपला पाठपुरावा तत्कालीन दळणवळणमंत्री सी. पी. जोशी यांच्याकडे सुरु होता. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या, असे आढळराव म्हणाले. २०१७ ला चांडोली ते नाशिकफाटा अशी निविदा निघाली होती. पण, पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्याला हरकत घेतली. आपल्या हद्दीतील (नाशिकफाटा ते मोशी टोलनाका) काम आपणच करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने हे काम रखडल्याचे आढळराव  यांनी सांगितले.

भूसंपादनातील अडचणीमुळे ६० मीटरचा हा रस्ता ४५ मीटरचा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा मोठ्या प्रकल्पांसाठी एक दोन भेटी जरुरी नसून प्रत्येक टप्यावर पाठपुरावा करून काम करून घेणे आवश्यक असते, असे सांगत त्यांनी नाव न घेता विद्यमान खासदारांना टोला लगावला. केवळ मंत्र्यांकडे पत्र देऊन मी गप्प बसलो नाही, तर जिल्हाधिकारी पातळीपर्यंत विविध बैठका घेऊन त्यातील अडचणी सोडवल्याने शेवटी हे काम मंजूर झाले, असे ते म्हणाले.

हे रुंदीकरण झाल्यानंतर चाकण जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर होईल, असा आशावाद खुद्द गडकरी यांनी व्यक्त केला आहे. एकाच राज्यातील दोन शहरांना जोडणारा हा देशातील एकमेव राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६० जुना, ५० नवा) आहे. सध्या चारपदरी असलेल्या या हायवेच्या सहापदरीकरणास साडेसहाशे कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यानंतर शिर्डीच्या भाविकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. या हायवेलगतच्या एमआय़डीतील कंपन्यांची वाहतूकही सुरळीत होणार आहे. या कामात चाकणला अडीच किलोमीटरचा उड्डाणपूल होणार असल्याने तेथील दररोजची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख