पुणे पदवीधरचा संग्राम दोन मराठ्यांतच ? दोन्ही पक्षांचे उमेदवार आज जाहीर होणार.. - Pune graduate struggle between two Marathas Candidates of both the parties will be announced today | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे पदवीधरचा संग्राम दोन मराठ्यांतच ? दोन्ही पक्षांचे उमेदवार आज जाहीर होणार..

उत्तम कुटे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादीनंतर आता भाजपमधूनही सांगलीतील प्रबळ मराठा इच्छूकाचे नाव समोर आले आहे.या दोन्ही पक्षांचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

पिंपरी : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची लढत ही सांगलीतील दोन मातब्बर मराठा उमेदवारांतच होण्याचे संकेत आज मिळाले. राष्ट्रवादीनंतर आता भाजपमधूनही सांगलीतील प्रबळ मराठा इच्छूकाचे नाव समोर आले आहे.या दोन्ही पक्षांचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी उमेदवार सांगलीतील असल्याने तेथीलच मातब्बर उमेदवार देऊन ही प्रतिष्ठेची जागा जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. त्यासाठी संग्राम देशमुख यांचे नाव आज पुढे आले. या जागेसाठी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली असली, तरी उमेदवारीबाबत ते  मोठी गुप्तता पाळून आहेत. मात्र, दुसरीकडे उमेदवार निश्चीत नसताना सुद्धा एकामागोमाग एक तयारीच्या बैठकांचे सत्र त्यांनी सुरु केलेले आहे. त्यात उमेदवार कुणीही असो आपल्याला विजय मिळवायचाय असे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे, असे काल रात्री पुण्यात झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका पक्ष पदाधिकाऱ्याने सांगितले. पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे महापौर माई ढोरे, शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आदी या बैठकीला हजर होते.

केलेली मतदारनोंदणी, मते खेचण्याची ताकद आणि प्रतिस्पर्धी उमेदवार पाहून पक्ष उमेदवारी देणार आहे, असे भाजपच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्याने सांगितले. हेच निकष उमेदवारीच्या शर्यतीतील इतर इच्छूकांना लावले जाणार असल्याची माहिती त्याने दिली. तर, एक पद, एक व्यक्ती ही कसोटीही यासाठी विचारात घेतली जाणार असल्याचे पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. देशमुख हे सांगली जिल्ह्यातले मोठं प्रस्थ आहे. त्यांचे दोन साखर कारखाने, सुतगिरण्या आणि शिक्षणसंस्थाही आहेत. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या बंधूंनीही पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळलेले आहेत. संभाव्य प्रतिस्पर्धी व देशमुख यांच्या गावात वीस किलोमीटरचेच अंतर आहे. या जमेच्या बाजू उमेदवारी मिळण्यासाठी त्यांच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्याने त्यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून आता पुढे आले आहे.
 
राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ता. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार म्हणून रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने अरूण लाड व उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर असून भारतीय जनता पक्षाकडून संग्राम देशमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शेखर मुंदडा, रवींद्र भेगडे यांच्यासह राजेश पांडे, शेखर चरेगावकर यांचेही नाव चर्चेत आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख