मी जिंकण्यासाठी निवडणूक लढतोय : अरूण लाड

लाड यांच्या उमेदवारीने पदवीधर मतदारसंघातला सामना दोन सांगलीकरांमध्ये रंगणार आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीने संग्राम देशमुख यांनी बुधवारी अर्ज भरला असून लाड हे आज अर्ज भरणार आहेत.
 मी जिंकण्यासाठी निवडणूक लढतोय : अरूण लाड
lad12.jpg

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून सांगलीचे अरूण लाड यांची उमेदवारी काल रात्री उशीरा जाहीर करण्यात आली. लाड यांच्या उमेदवारीने पदवीधर मतदारसंघातला सामना दोन सांगलीकरांमध्ये रंगणार आहे. भारतीय जनता पार्टीच्यावतीने संग्राम देशमुख यांनी बुधवारी अर्ज भरला असून लाड हे आज अर्ज भरणार आहेत. विरोधकांनी देशमुख यांच्या रूपाने सांगलीमधलाच बहुजन चेहरा दिला असला तरी मी जिंकण्यासाठी निवडणूक लढतोय, अशी प्रतिक्रिया अरूण लाड यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत टि्वट करून अरूण लाड यांची उमेदवारी घोषित केली आहे. 

अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस शिल्लक असताना बुधवारी रात्री लाड यांची उमेदवारी जाहीर झाली. रात्री उशीला लाड यांना उमेदवारीबाबत कळविण्यात आले. सकाळी ते अर्ज भरण्यासाठी सांगलीवरून पुण्यााला निघाले आहेत. पक्षात अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागल्याचे सांगण्यात येत आहे. लाड यांनी गेल्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सांरग पाटील यांच्याविरोधात बंडखोरीकेली होती. त्यांना २८ हजार मते मिळाली होती. यावेळी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत.

गेल्या निवडणुकीत भाजपाकडून चंद्रकांत पाटील हे उमेदवार होते. यावेळी देशमुख यांच्या रूपाने भाजपाला तगडा उमदेवार मिळाला असून दोन सांगलीकरांमध्ये लढत रंगण्याची चिन्हे आहेत. देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रात काम असल्याने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा संपर्क चांगला आहे. सातारा, सांगली कोल्हापूरमधल्या बहुतांश संस्था कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लाड यांना त्याचा निश्‍चितपणे फायदा होणार आहे. भाजपाचीही पुण्यात ताकद आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार आहे.  

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर मतदार आपला प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठविणार आहेत. यापूर्वी दोनवेळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून विजय मिळविल्यामुळे त्यांचा वारसदार ठरविताना पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in