पुण्याची गरज मोठी पण मिळाले फक्त 4313 रेमडिसिव्हर इंजेक्शन - pune gets 4313 remidisiver injection on Apr 16 though demand very high | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

पुण्याची गरज मोठी पण मिळाले फक्त 4313 रेमडिसिव्हर इंजेक्शन

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

येत्या २० एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे

पुणे : पुण्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनची टंचाई संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही आज केवळ 4313 रेमडिसिव्हर इंजेक्शन्स उपलब्ध झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या ग्राणीण भागातील रुग्णालयांना ती थेट दिली जाणार आहेत. कोरोनाचे 7137 गंभीर रुग्ण पुण्यात आहेत. 

ऑक्सिजन बेड आणि व्हेंटीलेटर याप्रमाणात शहरातील रुग्णालयांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय
जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. शहरात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात
तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ सुरू आहे. संपूर्ण पुण्यात फिरूनही रुग्णाचे प्राण वाचविण्यसाठी एकही इंजेक्शन मिळत नाही, या संतापाचा उद्रेक गुरुवारी झाला. रुग्णांच्या संतप्त नातेवाइकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याची गंभीर्याने दखल जिल्ह्याधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी घेतली.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वितरणाची सद्यःस्थिती काय आहे, याची माहिती हे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयांमधील एकूण किती खाटा आहेत? त्यापैकी किती ऑक्सिजन आणि किती व्हेंटीलटेर्स आहेत त्याची सविस्तर माहिती घेऊन त्या प्रमाणात रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रांत अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत चार हजार ३११ रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाली. हे सर्व इंजेक्शन तीनशे रुणालयांमध्ये ऑक्सिजन खाटा आणि व्हेटीलेटर्स या निकषांवर वितरित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

राज्यातही या इंजेक्शनची टंचाई असून अन्न व औषध प्रशासनमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत आज आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की हे इंजेक्शन आज मागणीपेक्षा १२ हजार ते १५ हजार ने कमी मिळाले आहेत. त्यामुळे हा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्राला रोजी 55 हजार इंजेक्शन पुरविण्याची तयारी या कंपन्यांनी दाखवली होती. प्रत्यक्षात  तर ३७ ते ३९ हजारपर्यंतच त्यांनी ते पुरवले आहे. येत्या २० एप्रिल नंतर हा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन कंपन्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

निर्यातबंदीमुळे रेमडेसिव्हरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात या कंपन्यांना त्यांचा माल इथं विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांशी देखील बोलणं झालं आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचं काम आमच्या विभागाकडून सुरू आहे.” अशी माहिती यावेळी शिंगणे यांनी दिली.

 १६ एप्रिल रोजी पुणे शहरातील स्थिती

- दिवसभरात ५३७३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ५०४९ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ६५ रुग्णांचा मृत्यू. १४ रूग्ण पुण्याबाहेरील.
- ११९६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३५४७९७.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४६२४.
- एकूण मृत्यू -६००२.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २९४१७१.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २३५६४.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख