काँग्रेसचे कार्यकर्ते रामभाऊ बराटे यांचे निधन - Pune Congress activist Rambhau Barate passes away | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे कार्यकर्ते रामभाऊ बराटे यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 डिसेंबर 2020

रामभाऊ बराटे हे काँग्रेसचे व माजी शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे कट्टर समर्थक होते.

वारजे माळवाडी : जिल्हा परिषदेचे बांधकाम आरोग्य समितीचे माजी सभापती रामभाऊ बाबासाहेब बराटे (वय 70) यांचे हृदयविकाराचा आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे दोन विवाहित भाऊ, पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हवेली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन बराटे यांचे ते वडील होत.

कोरोनापूर्वी वारजे जकात नाका परिसरात झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग हा त्यांचा सामाजिक जीवनातील शेवटचा कार्यक्रम ठरला. काही दिवसांपूर्वी त्याना कोरोनाची लागण झाली होती त्यातून ते बरे देखील झाले होते. परंतु त्यांच्या हृदयविकारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यातच त्यांचे निधन झाले.
 त्यांचे आजोबा व वडील वारकरी संप्रदायात होते. त्यांच्या घरात विठ्ठल मंदिर होते. 

रामभाऊ हे काँग्रेसचे व माजी शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे कट्टर समर्थक होते.
वारजे गावचे माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, व काँग्रेसच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. वारजे माळवाडीतील वाहतूक व्यवस्था व रस्त्यावरील अतिक्रमण यावर ते आग्रहाने नेहमी बोलत असे. सरपंच असताना वारजे गावासाठी दर माणशी 100लिटर पाणी योजना राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी खडकवासला धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र अशी पाणी योजना पूर्ण केली. खानापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, वारजे परिसरात ओढ्यावर पूल बांधणे अशा कामासाठी तसेच वारजे विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. 

रामभाऊ बराटे यांनी भूषविलेली पदे

 

 1. 1975 - युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वारजे ब्लॉक
 2. 1973 ते 1984- या दोन पंचवार्षिक मध्ये वारजे गाव चे उपसरपंच व सदस्य
 3. 1984 ते 1995-  या दोन पंचवार्षिकमध्ये वारजे गावचे सरपंच व सदस्य
 4. 1983 ते 1989- जिल्हा उपाध्यक्ष युवा कॉंग्रेस
 5. 1987ते 88- पुणे बाजार समितीचे सभापती
 6. 1988- सरपंच परिषदेचे महाराष्ट्र याचे अध्यक्ष
 7. 1989- वारजे येथे श्रीराम अर्बन को- ऑप. क्रेडीट सोसायटी अध्यक्ष
 8. 1992-97 पुणे जिल्हा परिषद सदस्य 
 9. 1995 ते 1997- जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती
 10. 1997- पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस
 11. 2002 व 2007 मध्ये महापालिकेची काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली.
 12. 2017- काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख