'ये तो अभी ट्रेलर है' हे विधान भरणेंना महागात पडले

इंदापूरला पाणी देण्याच्या योजनेवर मोठे राजकीय वादळ उठल्यानंतर पाटील यांनी या योजनेस स्थगिती दिली.
 Dattatraya Bharane,Ujani dam .jpg
Dattatraya Bharane,Ujani dam .jpg

पुणे : इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना उजनीतून (Ujani dam) पाच टीएमसी सांडपाणी देण्याच्या नावाखाली सर्वेक्षण करण्याच्या योजनेस जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्थगिती देत असल्याचे मंगळवारी (ता. 18 मे) जाहीर केले. त्या पद्धतीचे आदेश काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंदापूरला पाणी देण्याच्या योजनेवर मोठे राजकीय वादळ उठल्यानंतर पाटील यांनी या योजनेस स्थगिती दिली.(Proposal to take 5 TMC water from Ujani dam to Indapur canceled)

उजणी धरणाचे पाणी इंदापूरला नेण्यासंदर्भात सर्वेक्षणाचे आदेश पारीत झाल्यानंतर राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी इंदापूरच्या 22 गावांना पाणी देण्याचा प्रकार म्हणजे "ये तो अभी ट्रेलर है' असा उल्लेख केला होता. बहुधा भविष्यात आणखी मोठ्या योजनांची आखणीचाही त्यांचा होरा होता. हेच विधान भरणे यांना महागात पडले असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

इतके सारे झाल्यानंतरही उजनीतून एक थेंबही पाणी इंदापूरला नेणार नाही, असे भरणे नेहमीच म्हणायचे. या योजनेसाठी भरणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचे मोठेच पाठबळ होते, हे स्पष्टच आहे. उजनी जलाशयातील पाण्याचे शंभर टक्के नियोजन झालेले आहे. अजूनही अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, करमाळा, मंगळवेढा आणि मराठवाडा भागासाठी पाणी पोचले नाही. अनेक भागात योजनेसाठीची कामे झालेली आहेत, पाणी मात्र अद्याप पोहचले नाही, अशी स्थिती असतानाही इंदापूरचे भरणे यांनी उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना नेण्याचा घाट घातला होता. 

त्याला पुणे, पिंपरी-चिंचवड भागातून येणाऱ्या सांडपाण्याचे नाव देण्यात आले होते. उजनीच्या उर्ध्व भागातील पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी नेण्यास सोलापूरकरांचा कोणताच विरोध नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाटील यांच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओत त्यांनीही सोलापूरकरांचा गैरसमज झाला आहे, उजनीतून एक थेंबही पाणी नेणार नसल्याचे स्पष्ट करीत या योजनेला स्थगिती देत असल्याचे सांगितले. सुधारित आदेश देणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळेच सुधारित आदेशाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. हा आदेश निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे विविध पक्ष व संघटनांनी जाहीर केले आहे. (Proposal to take 5 TMC water from Ujani dam to Indapur canceled) 
 
उजणीच्या पाण्यासंदर्भात पडद्यामागील हालचाली 

सोमवारी व मंगळवारी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सोलापूर जिल्ह्यातील संतप्त प्रतिक्रिया, शेतकऱ्यांमधील, संघटनांमधील उद्रेक, माध्यमांतून होत असलेली टिका, लोकप्रतिनिधींमधील अस्वस्थता या साऱ्या बाबी कानावर टाकल्या. प्रथम पवार यांची नकारघंटा पाहून तेथून त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे धाव घेतली. पवार यांचे सोलापूरवर प्रेम, त्यातून सद्यस्थितीत सुरु असलेल्या बाबी भविष्यात फटका बसणाऱ्या ठरतील, असे सांगून या योजनेस स्थगिती देण्याची विनंती केली.

तेव्हा पवार यांनी अजित पवारांकडे पुन्हा पाठविले. दरम्यान, पवार काका-पुतण्यात संवाद झाला अन्‌ शिंदे यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेण्यास सांगितले. आपले पत्र तसेच आमदार बबनराव शिंदे यांचे पत्र सोबत होतेच. मुंबईत मोहोळचे आमदार यशवंत मानेही आपल्या पत्रासह उपस्थित होते. दीपक साळुंके, उमेश पाटील, कल्याणराव काळे, उत्तमराव जानकर सोबत होतेच. सर्वांनी जलसंपदा मंत्री पाटील यांची भेट घेऊन पत्र दिले. तेव्हा त्यांनी स्थगिती दिली. अजूनही या योजनेबाबत सोलापूरकरांमध्ये गैरसमज असल्याचाच नेत्यांचा होरा आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com