SARKARNAMA EXCLUSIVE : पुण्यातील या आमदाराच्या तब्बल तीस कोटींच्या मालमत्तेवर जप्ती - Proposal to confiscate assets worth Rs 30 crore of MLA form Pune | Politics Marathi News - Sarkarnama

SARKARNAMA EXCLUSIVE : पुण्यातील या आमदाराच्या तब्बल तीस कोटींच्या मालमत्तेवर जप्ती

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

बॅंक गैरव्यवहार प्रकरणी आणखी काही घडामोडींची शक्यता

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक अर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपींची मालमत्ता जप्त करण्यास पोलिसांना प्रारंभ केला आहे. या बॅंकेचे सर्वेसर्वा राहिलेले आणि प्रमुख आरोपी आमदार अनिल भोसले यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले आणि त्यांच्याकडील एकूण चार गाड्या जप्त करण्यात आल्या. यात एक लॅंड क्रुझर आणि एक कॅमरे आहे. चार दिवसांपूर्वी हे छापे पडले होते. 

पोलिस यावरच थांबले नसून भोसले यांच्या तीस कोटी रुपयांच्या मालमत्तेचा शोध घेण्यात आला आहे. ही मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविण्यात आला आहे. या मालमत्तेची विक्री करून त्या निधीतून बॅंकेच्या ठेवीदारांना काही रक्कम परत देण्यासाठी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा प्रस्ताव पाठवला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यांतर्गत दोषी संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारला आहे. भोसले यांची उरूळकांचन येथे जमिनीचे मोठे क्षेत्र आहे. तसेच त्यांचे निवासस्थान व इतर मालमत्ता यांचाही या यादीत समावेश आहे. आतापर्यंत तीस कोटी रुपयांच्या मालमत्तेचा शोध लागल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आणखी काही मालमत्तांचा शोध सुरू आहे. त्यांची मालकी स्पष्ट झाल्यानंतर त्या जप्त करण्याबाबत सरकारला पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात येईल. याबाबत येत्या एकदोन दिवसांत आणखी एक नेता अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेत माजी पदाधिकारी असलेल्या या नेत्याची पोलिसांनी आधी चौकशी केली होती. पण कारवाई केली नव्हती. आता कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीची मालमत्ता अशा प्रकारे जप्त होण्याची ही पहिलीच कारवाई असावी. 

अनिल भोसले हे  पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे आमदार म्हणून निवडून गेले आहेत. नंतर 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या पत्नी रेश्मा या भाजपकडून पुणे महापालिकेत निवडून गेल्या. आता महाआघाडीचे सरकार असल्याने पुणे पोलिसांच्या प्रस्तावावर नेते काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. भोसले हे गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

या बॅंकेचा सुरवातीचा गैरव्यवहार हा सुमारे 72 कोटी रुपयांचा असल्याचे दिसून आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आणखी 81 कोटी 50 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार तब्बल 153 कोटी 50 लाखांपर्यंत असल्याचे उघड झाले.

या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले, सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले या चौघांना पोलिसांनी यापुर्वी अटक केली आहे. तर याप्रकरणी एकूण 16 आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅंकेत ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने फिर्यादी यांच्या कंपनीला बॅंकेच्या रोख व शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते. यावेळी बॅंकेकडे 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्थिक गुन्हे शाखेने तपास केला. त्यामध्ये कर्जप्रकरणांमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आणखी एका संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच बॅंकेतील ठेवी, कर्ज प्रकरणे आदीचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या ऑडिटर कंपनीचीही चौकशी करण्यात आली. 

आरबीआयच्या निर्बंधानंतरही काढले दीड कोटी रुपये 
बॅंकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या अर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले होते. एकावेळी एका व्यक्तीला एक हजार रूपये काढण्याचा अधिकार दिला होता. असे असतानाही दिड कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आल्याची माहिती पोलिस तपासामध्ये पुढे आली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख