अॅाक्सीजन पातळी घटतेय? मग घरच्या घरी हे करा...आरोग्य विभागाचा सल्ला - Proning as an aid to help you breathe better during COVID19 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

अॅाक्सीजन पातळी घटतेय? मग घरच्या घरी हे करा...आरोग्य विभागाचा सल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेकांना श्वास घेण्यास त्रास, अॅाक्सीजनची पातळी कमी होण्याच्या तक्रारी येत आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेकांना श्वास घेण्यास त्रास, अॅाक्सीजनची पातळी कमी होण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे असे रुग्ण तातडीने रुग्णालयात धाव घेत आहेत. परिणामी, देशभरातील रुग्णालयांमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याअनुषंगाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. अॅाक्सीजनची पातळी कमी होत असल्यास काय करावे, याबाबत सुचना दिल्या आहेत.

शरीरातील अॅाक्सीजनची पातळी कमी होत असेल तर रुग्णाला वेगवेगळ्या पध्दतीने झोपवून ही पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. वैद्यकीय भाषेत त्याला 'प्रोनिंग' असे म्हटलं जातं. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्यांना याचा फायदा होऊन शरीरातील अॅाक्सीजनची पातळी वाढण्यास मदत होते. कोरोनावर घरीच उपचार घेत असाल तर ही पध्दत अत्यंत उपयुक्त असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रोनिंग कसे करावे?

अॅाक्सीजन पातळी 94 पेक्षा कमी होत असलेल्या रुग्णांसाठी ही पध्दत फायदेशीर ठरत आहे. यामध्ये तुम्हाला पोटावर झोपावे लागते. हे करताना एक उशी मानेखाली, एक किंवा दोन उशा छातीखाली आणि दोन उशा पायाखाली ठेवाव्या लागतात. ही पहिली पध्दत झाली. त्यानंतर एका अंगावर उजव्या बाजूला झोपणे. तिसऱ्या पध्दतीत टेकून तिरके बसणे तर चौथ्या पध्दतीत एका अंगावर डाव्या बाजूला झोपणे. त्यानंतर पुन्हा पहिल्या पध्दतीप्रमाणे झोपणे.

काय काळजी घ्यावी?

जेवणानंतर पुढील एक तास प्रोनिंग करणे टाळावे. तुम्हाला शक्य असेल तेवढ्याच वेळ प्रोनिंग करावे. तुमच्या सोयीनुसार 16 तासांपर्यंत हे करू शकता. प्रोनिंग करताना तुमच्या स्वास्थ्यानुसार उशा थोड्याफार हलवू शकता.

कोणी करू नये?

गर्भवती महिलांनी प्रोनिंग करू नये. तसेच हृदयरोग, मणक्याचे व संबंधित इतर आजार असलेल्यांनी प्रोनिंग करणे टाळावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच डॅाक्टरांचा सल्लाही आवश्यक आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख