एसआरए प्राधिकरणानेच प्रकल्प उभारावेत... - The projects should be set up by the SRA authority itself | Politics Marathi News - Sarkarnama

एसआरए प्राधिकरणानेच प्रकल्प उभारावेत...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

झोपडीवासियांना दिलासा मिळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने या प्रकल्पांचे बांधकाम स्वतः तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.

मुंबई : एसआरए प्रकल्प रखडल्याने हलाखीत जीवन जगणाऱ्या झोपडीवासियांना दिलासा मिळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने या प्रकल्पांचे बांधकाम स्वतः तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. 

प्रकल्प मंजूर झाले की एक बिल्डर दुसऱ्याला व तो तिसऱ्याला विकतो व प्रकल्प रखडतो. अशावेळी स्थानिक राजकारणी हात धुवून घेतात, असेही शेट्टी यांनी सांगितले. त्यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघातील आठ एसआरए प्रकल्पांचे काम अनेक वर्षे रखडले आहे. ते काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी शेट्टी यांनी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून ही सूचना केली आहे. 

1. श्रीमाउली  बंदर पाखाडी गृहनिर्माण संस्था, 2. पोइसर डॉ. आंबेडकर नगर एसआरए गृहनिर्माण संस्था, इंदिरा नगर, 3. लोकमान्य टिळक गृह निर्माण संस्था, कांदिवली पूर्व, ४. सिद्धेश्वर (ए) सहकारी संस्था, 90 फिट रोड कांदिवली पूर्व, ५. वेस्टर्न अबिटेड, राजेंद्र नगर, बोरीवली पूर्व. ६. सीताराम गृह निर्माण संस्था , बोरीवली पूर्व, ७. बोरीवली अविराही एसआरए को.ऑप.हा.सो. (नियो.) बोरीवली पूर्व व ८. विघ्नहर्ता अंबावाडी, दहिसर पूर्व हे एसआरए प्रकल्प रखडल्याचा शेट्टी यांचा दावा आहे. 

प्रत्येक नागरिकाला स्वतःचे पक्के घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना आणली आहे. तो हेतू साध्य करण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने आपल्या परीने तातडीने प्रयत्न करावेत. अनेक झोपडीधारकांचे पुनर्वसन अडकले आहे, त्यावर एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी विनंती शेट्टी यांनी केली आहे. अशा अनेक रखडलेल्या प्रकल्पांबाबत आपण वारंवार पाठपुरावा केला आहे. 

सरकारने आता यासंदर्भातील नियमांमध्ये बदल केल्यामुळे ही प्रक्रिया सोपी व वेगवान झाली आहे. त्यामुळे एसआरए प्राधिकरणाने तातडीने हस्तक्षेप करून झोपडीवासियांना दिलासा द्यावा, असे पत्रात म्हटले आहे. 

उत्तर मुंबईतील हे आठ प्रकल्प खूप काळ अडले आहेत. एसआरए अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांना संमती दिली नाही. त्यामुळे बिल्डर या प्रकल्पाचे काम सुरू करू शकत नाहीत. अशा स्थितीत अनेक जण अन्य झोपडपट्ट्यांमध्ये किंवा काही जण मुंबईबाहेर लांब गेले काहीजण गावी गेले तर काहीजण बेघर झाले आहेत, असेही शेट्टी यांनी दाखवून दिले. 

अनेक ठिकाणी बिल्डर एसआरए प्रकल्प सुरु करण्याची संमती घेतात व काही वर्षांनी प्रकल्प दुसऱ्याला विकतात. दुसरा बिल्डर हा प्रकल्प तिसऱ्याला विकतो, यात स्थानिक राजकारणीदेखील हात धुवून घेतात व झोपडीवासीय हालात राहतात. म्हणून अशा रखडलेल्या प्रकल्पांचा ताबा एसआरएने घ्यावा व प्रकल्प पूर्ण करावा. पुनर्वसनाच्या आणि विक्रीच्या इमारतीही एसआरए ने स्वतः बांधून त्या स्वतःच विकाव्यात, असेही शेट्टी यांचे म्हणणे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख