धक्कादायक : हॅास्पिटल मालकाने 96 रुग्णांचा ऑक्सिजनच बंद केला...व्हिडिओ व्हायरल - Private hospital in Agra shut off oxygen supply of covid patients | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : हॅास्पिटल मालकाने 96 रुग्णांचा ऑक्सिजनच बंद केला...व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जून 2021

ऑक्सीजन बंद केल्यानंतर किती रुग्ण जगू शकतात, हे पाहण्यासाठी पाच मिनिटे पुरवठा बंद केल्याचे कबूल करताना दिसतात.

आग्रा : कोरोना महामारीमध्ये मागील दोन महिने देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता. पण काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असल्याने ऑक्सीजनची मागणीही कमी झाली असून बहुतेक रुग्णालयांना नियमित पुरवठा सुरू आहे. या काळात एका रुग्णालयाने ऑक्सीजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 96 रुग्णांचा ऑक्सीजन पुरवठाच पाच मिनिटे बंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

आग्रा येथील पारस रुग्णालयात ही घटना घडली आहे. या रुग्णालयाचे संचालक डॅा. अरिंजय सिंह यांचा याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते ऑक्सीजन बंद केल्यानंतर किती रुग्ण मरू शकतात, हे पाहण्यासाठी पाच मिनिटे पुरवठा बंद केल्याचे कबूल करताना दिसतात. हे मॅाक ड्रील असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमध्ये ऑक्सीजन अभावी 22 रुग्ण निळे पडल्याचा दावाही त्यांनी केला. सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

हेही वाचा : मोदी-ठाकरेंचं गुफ्तगू; राज्यात राजकीय चर्चांना उधाण

ही घटना 27 एप्रिल रोजी घडली आहे. त्यावेळी रुग्णालयात 96 रुग्ण उपचार घेत होते. ऑक्सीजनचा पुरवठा कमी होत असल्याने अरिंजय सिंह यांनी नातेवाईकांना रुग्णांना अन्य रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. पण बहुतेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा असल्याने नातेवाईक त्यासाठी तयार झाले नव्हते. त्यानंतर या रुग्णांसाठी ऑक्सीजनचे व्यवस्थापन कसे केले, हे सांगतानाचा अरिंजय सिंह याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मुख्यमंत्र्यांना ऑक्सिजन मिळत नाही

व्हिडिओमध्ये अरिंजय जैन म्हणतात की, आम्ही नातेवाईकांना सांगितले, मुख्यमंत्र्यांना ऑक्सीजन मिळत नाही, रुग्णांना इतरत्र हलवा. पण काहींनी रुग्णालय सोडण्यास नकार दिला. मग मी मॅाक ड्रील करू असं म्हणालो. यातून कोण मरणार आणि कोण जगणार हे कळेल. त्यामुळं सकाळी सात वाजता पाच मिनिटे ऑक्सिजन पुरवठा बंद केला. हे कोणालाही माहिती नव्हते. त्यानंतर आम्ही 22 असे रुग्ण शोधले ज्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यांचे शरीर निळे पडू लागले होते,' असा संवाद व्हिडिओमध्ये आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जैन यांनी त्यावर खुलासा केला आहे. ऑक्सीजन बंद करण्यात आला नव्हता, केवळ मॅाक ड्रील घेतली, त्यामध्ये कमी व जास्त ऑक्सीजन लागणाऱ्या रुग्णांची विभागणी करण्यात आली, असं स्पष्टीकरण जैन यांनी दिलं आहे. 

प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

आग्राचे जिल्हाधिकारी प्रभु एन सिंग यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. व्हिडिओ ज्या दिवसाचा आहे, त्यादिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या रुग्णालयात ऑक्सीजनचा तुटवडा होता पण आम्ही 48 तासांत पुरवठा केला. रुग्णालयात 26 व 27 एप्रिल रोजी सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख