बिहारच्या विजयोत्सवातून मोदींनी केला बंगाल मोहिमेचा पांचजन्य नाद..! - prime minister narendra modi announces mission west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या विजयोत्सवातून मोदींनी केला बंगाल मोहिमेचा पांचजन्य नाद..!

मंगेश वैशंपायन
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या घसघशीत विजयाचा आज जोरदार विजयोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल दिग्विजयाचे सूतोवाच केले. 

नवी दिल्ली : बिहारच्या विजयानंतर भाजपला आता पश्चिम बंगालच्या दिग्विजयाचे वेध लागले आहेत. बिहारच्या विजयोत्सवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या पश्चिम बंगाल मोहिमेचाही पांचजन्य नाद केला. लोकशाही मार्गाने भाजपचा मुकाबला करू न शकणाऱ्यांनी काही राज्यांत भाजप कायर्कत्यांच्या हत्या करण्याचा रस्ता स्वीकारला असून, त्यांचे मनसूबे जनताच उधळून लावेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दिला. 

बिहार व ११ राज्यांच्या पोटनिवडणुकांत भाजपला मिळालेल्या विजयानिमित्त आज रात्री झालेल्या आभारदर्शक सभेत बोलताना मोदींनी विकासकेंद्रित राजकारणावर भर दिला. भारतात भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विकास हाच विजयाचा आधार असेल हेच बिहारमधील निवडणुकीने दाखवून दिले, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. ज्यांना हे समजले नाही त्यांची अनामत ठिकठिकाणी जप्त झाली, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मला इशारे देण्याची गरज नाही, ते काम जनताच करेल. परंतु, भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करून, मृत्यूचा खेळ करून कोणी मते मिळवू शकत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे , असा  इशारा मोदींनी बंगाल व तृणमूल काँग्रेसचे नाव न घेता दिला. काश्मीरपासुन कन्याकुमारी पर्यंत काही पक्षांतील घराणेशाही हा देशाच्या लोकशाहीला असलेला सर्वांत मोठा धोका आहे असे सांगून पंतप्रधानांनी काँग्रेससह काश्मीरमध्ये भारताविरूध्द बोलणाऱ्या नेत्यांवरही प्रहार केला.

बिहारमध्ये भाजपच्या विजयात महिलाशक्ती नामक सायलेंट व्होटरनी त्यांची शक्ती दाखवली. बिहारमधील विजयाचे अनेक अर्थ असल्याचे सांगतानाच भाजप बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा संकल्प सिध्द करेल, असे मोदींनी स्पष्ट केले. यंदाची दिवाळी व्होकल फॉर लोकल या मंत्राने साजरी करण्याचे आग्रही आवाहन मोदींनी केले. त्याचबरोबर कोरोनाविषयक आरोग्य नियमांचे पालन करण्याचाही आग्रहही त्यांनी धरला.

पंतप्रधानांनी आजच्या भाषणात पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रोत्साहन दिले. नड्डा जी तुम आगे बढो, असे म्हणत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न मोदींनी केला. आजच्या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. मात्र मोदींनी नड्डा यांनाच जास्त सन्मान मिळेल याची काळजी घेतल्याचे दिसत होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख