सिरम अन् भारत बायोटेकच भारी; परदेशी लशींच्या तुलनेत कित्येक पटीने कमी किंमत - Prices of foreign vaccines are huge than covishield and covaxin | Politics Marathi News - Sarkarnama

सिरम अन् भारत बायोटेकच भारी; परदेशी लशींच्या तुलनेत कित्येक पटीने कमी किंमत

वृत्तसंस्था
बुधवार, 14 एप्रिल 2021

किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या सिरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर सुरू आहे. नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये या लशीचा एक डोस केवळ 250 रुपयांमध्ये तर सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत मिळत आहे. केंद्र सरकारला एका डोससाठी 150 रुपये मोजावे लागत आहेत. भारतात मे महिन्यापासून परदेशी लशींचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीने बाजी मारली आहे. 

देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. पण कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची प्रत्यक्ष उत्पादन क्षमता व भारतातील गरज यामध्ये तफावत निर्माण होत असल्याने अनेकदा लसीकरण केंद्रांवर लशींचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे लसीकरणाचे अपेक्षित लक्ष्य गाठण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे भारतात जवळपास सहा लशींना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 

औषध महानियंत्रकांनी काल रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या रांगेत आणखी पाच लशी असून त्यांनाही लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पण या लशींच्या किंमती सध्या भारतात वापरात असलेल्या लशींच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये या लशी मोफत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारवर मोठा बोजा पडू शकतो. तर खासगी रुग्णालयांमध्ये या लशी घेणं सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणार नाही.

...अशा आहेत लशींच्या किंमती

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन - 250 रुपये
स्पुटनिक व्ही - सुमारे 750 रुपये
फायझर - 1,431 रुपये 
मॅाडर्ना - 2,348 ते 2,715 रुपये 
सायनोफॅार्म - 5,650 रुपये
सायनोवॅक - 1,027 रुपये
जॅान्सन अँड जॅान्सन - 734 रुपये

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या किंमती जानेवारी महिन्यात जाहीर केल्या होत्या. या लशी भारतात येण्यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत त्यांच्या भारतातील किंमती निश्चित होणार नाहीत. मात्र, बाहेरील देशांमध्ये या लशींच्या किंमतींप्रमाणेच भारतातही त्या उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे भारतातील किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. 

...तरच मिळेल वापरासाठी परवानगी

भारतात परदेशी लशींना आणण्यासाठी उच्चस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. अमेरिका, यूके, जपान, चीन आदी देशांतील लशींना भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जाऊ शकते. परदेशामध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेल्या लस उत्पादक कंपन्या थेट भारताकडे परवागनी मागू शकतात. किंवा या लशी जागतिक आरोग्य संघटनेच्या लशींच्या सूचीमध्य असतील तर त्याही थेट भारतात परवागनी मागू शकतात. या लशी भारतात सुरक्षित आहेत किंवा नाहीत यासाठी कंपन्यांना सुरूवातीला 100 स्वयंसेवकांनाच लस देता येील. पुढील सात दिवस त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींचा पाठपुरावा करावा लागेल. त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक असेल तर या लशींना प्रत्यक्ष वापरासाठी मान्यता दिली जाईल.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख