मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा असेल, कोणाकडे पेटंट नाही.. दरेकरांचा राऊतांना टोला - Pravin Darekar said We have our own saffron on Mumbai Municipal Corporation, no one has a patent for this  | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा असेल, कोणाकडे पेटंट नाही.. दरेकरांचा राऊतांना टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायचे. त्यामुळे  मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल, याचे कोणाकडे पेटंट नाही," असा टोला विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

पुणे : "खासदार संजय राऊत यांचा आत्मविशवास गमावला आहे. त्यांच्या बोलण्यात पूर्वीइतका विश्वास दिसत नाही. मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायचे. त्यामुळे  मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल, याचे कोणाकडे पेटंट नाही," असा टोला विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. पुण्यात पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना ते उत्तर देत होते.

मुंबईत येथे भाजपच्या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आगामी मुंबई महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर भगवाच फडकेल, पण तो भाजपचा असेल. 2022 मध्ये सत्ता बदलून टाकू. मागील वेळीही सत्ता बदलली असतील, पण दोस्तीत दिली. आता नाही. भाजप प्रत्येक प्रभागात नियोजन करून सत्तांतर करू, भाजपचाच भगवा फडकू"

काल मुंबई येथे भाजपची बैठकी झाली यात फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. नवीन कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, की 'राजाचा जीव पोपटामध्ये, काही लोकांचा जीव मुंबई महापालिकेमध्ये'  अशी अवस्था आहे. त्यामुळे भ्रष्ट्राचाराचा आगार असलेली ही महापालिकेची सत्ता 2022 मध्ये बदलून टाकू. त्या वेळीही बदलू शकलो असतो, दोस्तीत ती दिली. पण आता नाही. आता भाजप प्रत्येक वार्डात, बुथमध्ये सत्तांतर करेल. प्रत्येक वार्डात एक नेता द्या, बुथमध्ये राजकीय कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यांना राजकारण समजले पाहिजे. माझे युवा मोर्चाला आव्हान आहे, त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान 50 युवा कार्यकर्त्यांशी संपर्क केलाच पाहिजे.

फडणवीस म्हणाले, की महिला मोर्चाला विनंती आहे, की प्रत्येक बुथमध्ये किमान 100 घरातील महिलांशी संपर्क केलाच पाहिजे. बुथ कमिटीनेही 100 घरांपर्यंत पोहचून त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आता `मॅन टू मॅन` पोहचावे लागेल. मला वाटलं होतं, की सत्ता मिळाल्यानंतर काहीतरी चांगले होईल, पण त्यांच्या डोक्यात सत्ता गेली, त्यांचे पतन निश्चित आहे. वर्ष व्हायच्या आत त्यांना सत्तेचा माज झळकतो आहे. हा माज तोडावाच लागेल. जनतेचा विचार करणारे लोक सत्तेवर आणावेच लागेल. मला विश्वास आहे, की भाजपची नवीन टीम फळी तयार करील 2022 साली मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा. कुठलीही विचारांची मिसळ नसलेला असेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही 

"महाविद्यालये बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही. या मतदारांत चीड आहे. राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही," असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. प्रवीण दरेकर म्हणाले, "भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल. भाजपचे देशमुख निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोतसाहन देऊ."
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख