ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी राजीनामा देऊन आता हे काम करावे... - pravin darekar demands resignation of Energy Minister Nitin Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी राजीनामा देऊन आता हे काम करावे...

विश्वभूषण लिमये
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

भाजपचा सोमवारी तीव्र आंदोलनाचा इशारा.... 

सोलापूर : वीजबिल सवलतीवरून ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि भाजप नेत्यांमधील शाब्दिक युद्ध जोरात सुरू आहे. राज्य सरकार राऊत यांना महत्त्व देत नसल्याची टीका भाजप नेते करत आहेत. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचीही मागणी विरोधी पक्ष करत आहे. त्यात आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आणखी एक पुढे पाऊल टाकून राऊतांनी पदाचा राजीनामा द्यावा अन् एमएसईबीचा कर्मचारी होऊन वाढीव वीजबिले तपासत बसावे, असा सल्ला दिला आहे.

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ दरेकर आज सोलापुरात आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी ही फटकेबाजी केली. 

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनातील लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना वाढीव वीजबिल आल्याच्या विरोधात येत्या सोमवारी भारतीय जनता पक्ष राज्यव्यापी आंदोलन करण्यात असल्याचेही दरेकर यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांमध्ये समन्वयाच्या अभाव असल्याने वाढीव वीज बिलासंदर्भात ग्राहकांची लूट होत असल्याची टीका त्यांनी केली.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून काँग्रेसच्या खात्यांच्या मंत्र्यांची काम होऊ दिली जात नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. ,
त्यामुळे  महाविकास आघाडीमध्ये काॅंग्रेसची फरफट होत आहे. काँग्रेसकडे स्वाभिमान आणि धाडस  नसल्याने ते सत्तेतून बाहेर पडू शकत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

मुंबईत भाजपचा मोर्चा 

दरम्यान वीज दरवाढी विरोधात मुंबई  भाजपा महिला आघाडीच्या मोर्चाने वांद्रे येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये सरकारने वीजबिलात सवलत द्यावी, ही मागणी होती. मात्र महिला मोठ्या संख्येने आणि आक्रमक झाल्यामुळे काही काळ महिला आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पाच महिलांच्या शिष्टमंडळाला महावितरणच्या आधिकाऱ्यांनी भेट देऊन ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्या बरोबर फोनवर संवाद साधून दिला. असिम गुफ्ता यांनी शिष्टमंडळात वेळ देणार असल्याचे मान्य केले. येत्या काही दिवसात या संदर्भात भेट होणार आहे. असिम गुप्ता यांच्या फोननंतर मोर्चा मागे घेण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख