प्रवीण गायकवाड-प्रकाश आंबेडकरांचे मराठा आरक्षणाबाबत या मुद्यावर एकमत  - Praveen Gaikwad-Prakash Ambedkar agree on Maratha reservation on this issue | Politics Marathi News - Sarkarnama

प्रवीण गायकवाड-प्रकाश आंबेडकरांचे मराठा आरक्षणाबाबत या मुद्यावर एकमत 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून मराठा समाजात अस्वस्थता आहे.

पुणे : मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन तसेच रस्त्यावरील लढाई नव्याने सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजात सामाजिक स्वास्थ बिघडू नये, यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर नेमकी काय भूमिका असावी, याबाबतही या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना गायकवाड म्हणाले,"आरक्षणाच्या मुद्यावरून दोन्ही समाज समुहामध्ये कोणत्याही परिस्थितीत तेढ निर्माण होता कामा नये, अशी सुरुवातीपासूनची माझी भूमिका आहे. या भूमिकेतूनच आंबेडकर यांची भेट घेतली.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते. त्याला उत्तर म्हणून बहुजन क्रांती मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या मोर्चामुळे मराठा आणि बहुजनांमध्ये सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, या भूमिकेतून आंबेडकरांनी त्यावेळी हे मोर्चे रद्द करण्याची भूमिका घेतली. त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे त्या वेळी महाराष्ट्रात चांगले सामाजिक वातावरण राहण्यास मदत झाली.'' 

"आंबेडकर हे दलित-ओबीसींचे मोठे नेतृत्व आहे. त्यांचा कायद्याचाही चांगला अभ्यास आहे. त्यामुळे आरक्षणाच्या लढ्यात नेमकी कोणती भूमिका घेतली तर ती मराठा समाजाला फायद्याची ठरेल याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. मराठा समाजाने "ईएसबीसी'च्या कोट्यातून आरक्षण मागितले, तर ते घटनेच्या चौकटीत बसणारे नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे ते टिकण्याची शक्‍यता कमी आहे. त्यापेक्षा 103 व्या घटना दुरस्तीप्रमाणे अस्तित्वात आलेले अर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी (ईडब्लूएस) आरक्षण मागितल्यास मराठा समाजाला शाश्‍वत स्वरूपाचे आरक्षण मिळेल. आंबेडकरांनीदेखील "ईडब्लूएस' कोट्यातून आरक्षण मिळाल्यास मराठा समाजाला त्याचा कायमस्वरूपी फायदा घेता येईल, असे सुचविले आहे,'' असे गायकवाड यांनी सांगितले. 

मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आक्षण मिळावे, ही भूमिका आहे. "ईएसडब्लू' आरक्षण घटनेच्या चौकटीत बसणारे असल्याने मराठा समाजाला त्याचा कायमस्वरूपी फायदा होऊ शकतो, असे गायकवाड यांनी सांगितले. "सरकारनामा'ने आयोजित केलेल्या ऑनलाइन संवादावेळीही गायकवाड यांनी हीच भूमिका मांडली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. शैक्षणिक प्रवेशांवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, अशी लोकभावना आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरक्षणावरील सुनावणी पाच न्यायाधीशांचे खंडपीठ करणार असल्याने यासाठी काही वेळ जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख