पालकमंत्र्यांचे दूध उत्पादकांबद्दलचे प्रेम पुतणामावशीचे  - Pratap Patil-Kavanekar criticizes Guardian Minister Satej Patil | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्र्यांचे दूध उत्पादकांबद्दलचे प्रेम पुतणामावशीचे 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

ते कसले पालक?

कोल्हापूर : दूध उत्पादकांना कोरोनाची लागण होऊ दे किंवा त्यांचा जीव जाऊ दे; पण आम्ही सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांना वेठीस धरणार हेच "गोकुळ'च्या निवडणुकीत पालकमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. आजवर "गोकुळ'मध्ये शेतकरी हिताचाच कारभार झाला, त्यामुळे संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार ही पालकमंत्र्यांची वल्गना थापेबाजी, ज्यांना उत्पादकांच्या जीवाशी खेळताना काही वाटत नाही, ते कसले पालक, त्यांचे उत्पादकांबद्दलचे प्रेम पुतणामावशीचे असल्याची टीका सत्तारूढ आघाडीचे उमेदवार प्रताप पाटील-कावणेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे राज्यातील 45 हजार संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या; पण विरोधी आघाडीतील मंत्र्यांनी गोकुळच्या सभासदांना या संकटात ढकलून निवडणुकीचा अट्टहास केला आहे. पालकमंत्र्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच शाहूवाडी व शिरोळ तालुक्‍यातील ठरावदारांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात जवळपास 50 ते 60 ठरावदार बाधित आहेत. जिल्ह्यात संचारबंदी असताना मंत्री, खासदार, आमदार सभा-मेळावे घेत आहेत. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जीव धोक्‍यात घालणाऱ्या पालकमंत्र्यांना हे पाप फेडता येणार नाही, असा टोलाही कावणेकर यांनी लगावला आहे.

कोरोनाची बिघडलेली स्थिती सरकारने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली तर निवडणूक स्थगित ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून गोकुळच्या मलईसाठी पालकमंत्री सुडाचे राजकारण करत आहेत.

कोरोनामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, बेड मिळत नाहीत, कोरोना नियंत्रणात आणण्यात पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. केवळ वैयक्तीक राजकीय असुरी महत्वकांक्षा यातून पालकमंत्र्यांनी ही निवडणूक लादली आहे. पण, त्यांना सूज्ञ शेतकरी धडा शिकवतील, असा टोलाही या पत्रकात लगावण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख