पवार साहेबांनी सूत्रे हलवली अन् मी मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.. - Prashant Jagtap on the occasion of the anniversary of the Nationalist Congress Party  | Politics Marathi News - Sarkarnama

पवार साहेबांनी सूत्रे हलवली अन् मी मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

मला माझे नाव न छापल्याचे दु:ख नव्हते. परंतु, तो एक प्रोटोकॉल होता. तो पाळला गेला नव्हता.

पुणे : राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ते महापैार असताना एक आठवण आज राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्ताने सांगितली. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीच्या विकास कामांचे भूमिपूजन होते. कार्यक्रम पत्रिकेत प्रशांत जगताप यांचे नाव न टाकल्यामुळे त्यावेळी राजकारण तापलं होतं. राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्रे हलवली अन् जगताप हे मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. Prashant Jagtap on the occasion of the anniversary of the Nationalist Congress Party 

या घटनेबाबत जगताप म्हणतात की, मी महापौर असताना २०१६ मध्ये स्मार्ट सिटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. कोणत्याही प्रकारचे टेंडर काढले गेले नसतानाच भाजपकडून या कार्यक्रमाचा घाट घालण्यात आला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार होते.

भाजपकडून केवळ सूड भावनेपोटी मी शहराचा प्रथम नागरिक असतानाही पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेतून माझे नाव वगळण्यात आले होते. मला माझे नाव न छापल्याचे दु:ख नव्हते. परंतु, तो एक प्रोटोकॉल होता. तो पाळला गेला नव्हता. अशा पद्धतीने पुणेकरांच्या अस्मितेवरच घाला घालण्यात आला होता. त्यामुळे, हा पुणेकरांचा अपमान असल्याने मी या कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या निर्णयाने भाजपमध्ये खळबळ उडाली. 

फडणवीस यांनी ‘तुम्ही पंतप्रधानांचा अपमान करीत आहात, तुम्हाला कार्यक्रमात सहभागी व्हावेच लागेल,’ अशी जणू धमकीवजा सूचना केली. मात्र, मी डगमगलो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे, अजित पवार,  शरद पवार साहेब यांना फोन करून मला कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले. मात्र, आता मी या कार्यक्रमात सहभागी झालो, तर पुणेकर मला माफ करणार नाहीत, अशी माझी भूमिका होती. या वेळी पवार साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. साहेबांनी नेमका काय प्रकार घडला आहे, हे फोन करून जाणून घेतले. त्यावर माझी भूमिका जाणून घेतली. ‘मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो. त्यानंतर निर्णय घेऊ,’ असे साहेब म्हणाले. त्यानंतर, सूत्रे हलली. 

मुख्यमंत्र्यांनी झालेल्या प्रकाराबाबत मुंबईतून लेखी दिलगिरी व्यक्त केली. तर, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली. त्यानंतर, साहेबांचा मला पुन्हा फोन आला. ‘आता तुमची काय भूमिका आहे?,’ अशी विचारणा केली. त्यावर, ‘साहेब, आता कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवे,’ असे मी त्यांना सांगितले. त्यावर, साहेबांनीही तशीच सूचना केली. शिवाय, मला म्हणाले, ‘प्रशांत जगताप एकटा नाही. त्याच्या पाठीशी खुद्द शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यामुळे, तुम्ही अजिबात काळजी करू नका...’  एखाद्या कार्यकर्त्यासाठी हा केवढा आधार होता. हा अनुभव केवळ मी एकट्यानेच नाही, तर राज्यात, देशात अनेकांनी घेतलेला असेल. पवार साहेबांचा हा आधार म्हणजे, कार्यकर्त्यांसाठी प्राणवायू आहे. साहेब, पक्षातील माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांची आपण इतकी काळजी घेता, तर आम्हा कार्यकर्त्यांना आणखी काय हवं? गेल्या २२ वर्षांमध्ये पक्षाचा विस्तार झाला आहे आणि यापुढील काळामध्ये होईलच. यामध्ये सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय कायम राहील, हा विश्वास आम्हाला कायम वाटत राहतो, असे जगताप म्हणाले. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख