#आंबेडकर स्मारक ; आमंत्रण आले तरी जाणार नाही...    - Prakash Ambedkar will not attend the ceremony of the Ambedkar Memorial | Politics Marathi News - Sarkarnama

#आंबेडकर स्मारक ; आमंत्रण आले तरी जाणार नाही...   

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

पुणे : दादर इंदू मिल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होती. मात्र, या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच इतर नेत्यांना बोलवण्यात आले नसल्याने हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. 

याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा, असे स्पष्ट मत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या आवारातील पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या निमंत्रणांवरुन राजकारण सुरु झाले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांनेच नव्हते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याबद्दल उघड नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली. यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. 

इंदू मिल स्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन आज मोठा गदारोळ झाला. सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही या कार्यक्रमातून डावलण्यात आले. यामुळे संतापलेल्या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली. घटक पक्षांच्या नाराजी ओढवून घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रमच अखेर रद्द केला. अशा प्रकारे महाआघाडी सरकारच्या कार्यकाळातील पहिल्याच मोठ्या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दणका दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार नवाब मलिक म्हणाले की, एवढा मोठा कार्यक्रम होणार होता मात्र, त्याचे योग्य नियोजन एमएमआरडीएने केले नाही. प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिले गेले नव्हते. मी मुंबईतील आमदार आणि मंत्री असूनसुद्धा मलाही निमंत्रण दिले नव्हते. भविष्यात हा कार्यक्रम मोठा घेतला जाईल म्हणून एमएमआरडीएने हा कार्यक्रम रद्द केला आहे

इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली. त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र, अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे. त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत.

'एमएमआरडीए'ने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आज दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार होता. त्याचे निमंत्रण अनेक नेत्यांना नसल्याचे सकाळपासून समोर येऊ लागले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या दोघांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. त्यावरुन दरेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, मला आणि देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मिळाले नाही. हे सरकार अहंकाराने भरलेले आहे. खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांच्या काळात स्मारकाच्या कामाला गती मिळाली. हे सरकार कोणत्याही कार्यक्रमाला विरोधी पक्षांना सन्मानाने बोलवत नाही. 
Edited  by : Mangesh Mahale
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख