प्रकाश आंबेडकर म्हणतात,  "मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी.. " - Prakash Ambedkar says, "The Chief Minister should announce immediate help to the flood victims." | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश आंबेडकर म्हणतात,  "मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी.. "

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा, जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल

पाटणा : परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. नदी-नाल्यांना महापूर आला आहे. राज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून काढणीसाठी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा, जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला आहे.

तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी काही मदत देता येईल, त्याची तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.  

राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.

 हेही वाचा : शरद पवार शेताच्या बांधावर..मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवर...? 

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख