पूनम महाजन एक पायरी वर चढणार : वडिलांप्रमाणे केंद्रीय मंत्री होणार! - Poonam Mahajan will take next step as will become a Union Minister like her father | Politics Marathi News - Sarkarnama

पूनम महाजन एक पायरी वर चढणार : वडिलांप्रमाणे केंद्रीय मंत्री होणार!

मंगेश वैशंपायन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

अनेक मंत्र्यांकडे जादा खाती असल्याने मंत्रीमंडळ विस्तार होण्याची चिन्हे 

नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनेक अनुभवी नेत्यांना वगळण्यात आले. यातीलच काही नेत्यांना केंद्रीतील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अनिल जैन, पी. मुरलीधर राव, सरोज पांडे, पूनम महाजन ही यातील आघाडीची नावे आहेत.

बिहार निवडणुकीच्या आगेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करू शकतात. गृहमंत्रीपदी अमित शहा यांची निवड केल्यावर सत्तारूढ सर्वेसर्वा नेतृत्वाने शहा यांच्या तुलनेत फारच शांत व सौम्य स्वभावाचे नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपपदाची जबाबदारी दिली. तथापि त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक दिल्ली किंवा पाटणा येथे पुढील महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. नड्डा यांच्या टीममधून वगळलेल्या काही नेत्यांनी आपापल्या काळात उल्लेखनीय संघटनात्मक काम केल्याने त्यांना वगळल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत होते. विजया रहाटकर यांनी जम्मू-काश्‍मीरपासून अनेक राज्यांत घट्ट केलेले महिला आघाडीचे जाळे, राम माधव यांचे ईशान्य भारतातील कार्यक्रम, पांडे यांनी अल्पवाधीत महाराष्ट्राच्या पक्षसंघटनेशी साधलेला समन्वय, महाजन यांनी भाजप युवा मोर्चाची राज्याराज्यांत रूजवलेली पाळेमुळे व घेतलेले उपक्रम, शाम जाजू यांनी दिल्ली प्रदेश भाजपमधील भांडणे मिटविण्यासाठी केलेली धडपड यांची दिल्लीतही वारंवार चर्चा होत असे. त्यामुळे या सर्वांकडील संघटनात्मक पदे काढून घेतल्याचीही चर्चा "दीनदयाळ उपाध्याय मार्ग' परिसरात सुरू झाली. त्यानंतर यातील काही नावे मोदी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दिसू शकतात असे पक्षसूत्रांनी सांगितले.

सध्या अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यांना त्यातून मुक्त करून नव्या चेहऱ्यांकडे वाणिज्य-उद्योग, दूरसंचार, अवजड उद्योग किंवा सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयांपैकी काहींची जबाबदारी दिली जाऊ शकते. बिहारपाठोपाठ पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीचे वारे सुरू होणार असल्याने त्या राज्यासह आंध्र प्रदेश, केरल व तेलंगणातील नवे चेहरे मोदी मंत्रिमंडळात दिसण्याची शक्‍यता वर्तविली जातेय.

पूनम महाजन यांचे वडिल अटलबिहारी वाजपेयी यांच्या तेरा दिवसांच्या पहिल्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. त्यानंतर ते दूरसंचारमंत्री राहिले होते. त्या मुंबईच्या खासदार आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास मुंबईत दोन केंद्रीय मंत्री होतील. पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री म्हणून सध्या काम पाहत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख