गुलाम नबी आझाद म्हणाले..'मी भाजपमध्ये प्रवेश करणार..पण..' - Politics will join bjp when we have black snow in kashmir says ghulam nabi azad pm | Politics Marathi News - Sarkarnama

गुलाम नबी आझाद म्हणाले..'मी भाजपमध्ये प्रवेश करणार..पण..'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

 'काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल तेव्हाच आपण भाजपात प्रवेश करणार..' असं सांगत गुलाम नबी आझाद यांनी या विषयीच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केलं आहे. 

नवी दिल्ली : राज्यसभेतून निवृत्त होत असलेले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोपाचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. गुजरातच्या पर्यटकांवर काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आझाद यांनी जी मदत केली व ज्या संवेदना दाखवल्या त्याची आठवण काढत असताना पंतप्रधानांचा आवाज भरुन आला होता. 

यानंतर गुलाम नबी आझाद हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. गुलाम नबी आझाद यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की,   १९९० पासून मी नरेंद्र मोदींना ओळखतो. आम्ही विविध चर्चामध्ये भाग घ्यायचो, आमच्यात वाद व्हायचे, पण नंतर आम्ही एकत्र चहा देखील घ्यायचो. 

मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य करणारे आणि याबाबत अफवा पसरविणारे मला अद्यापही ओळखत नाही.  'काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल तेव्हाच आपण भाजपात प्रवेश करणार..' असं सांगत गुलाम नबी आझाद यांनी या विषयीच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केलं आहे. 
 
आझाद यांच्याबद्दलची आठवण सांगताना मोदी म्हणाले, "काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात गुजरातचे आठ पर्यटक ठार झाले होते. त्यावेळी मला पहिला फोन आला तो गुलाम नबी आझादांचा. केवळ माहिती देण्यासाठी तो नव्हता, तर त्यांच्या आवाजात एखाद्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे काळजीही डोकवत होती. ते फोनवर बोलत असताना अश्रू आवरु शकत नव्हते. त्यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते. पर्यटकांचे मृतदेह आणण्यासाठी विमानाची सोय होऊ शकेल काय अशी विचारणा मी केली. मुखर्जीं साहेबांनी तातडीने विमान उपलब्ध करुन दिले. त्यावेळी रात्री गुलाम नबी आझादांचा पुन्हा फोन आला. त्यावेळी ते विमानतळावर होते,'' हे सांगताना पंतप्रधानांचा आवाज भरुन आला होता. 

"कोविड साथीच्या काळात मी सभागृह नेत्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी मी सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटावे, असा सल्ला आझाद यांनी मला दिला होती. मी तो मानला. आझाद यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये काम करण्याचा विशाल अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी मी निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय नसताना संसदेत आलो होतो. आम्ही संसदेच्या लाॅबीत आझाद यांच्याशी गप्पा मारत होतो. एका पत्रकाराने याबाबत आझाद यांना छेडले. त्यावेळी 'तुम्ही आम्हाला टीव्हीवर किंवा रस्त्यावर एकमेकांच्या विरोधात भांडताना पाहिले असेल, परंतु, या इमारतीत आम्ही सर्व जण एकत्र असतो,' असे उत्तर आझाद यांनी त्या पत्रकाराला दिले होते.," असेही मोदी म्हणाले. आझाद यांनी आपल्या सरकारी निवासस्थानात फुलवलेल्या बागेचाही मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख