ठाकरे कोत्या मनाचे नाहीत. भाजपचं हे कटकारस्थान...   - Politics Statement of Vinayak Raut regarding Governor Air Travel | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे कोत्या मनाचे नाहीत. भाजपचं हे कटकारस्थान...  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

उद्धव ठाकरे कोत्या मनाचे नाहीत, असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज सांगितले 

नवी दिल्ली : "राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जाणीवपूर्व दिशाभूल केली जात आहे. विमान प्रवासाबाबत राज्यपालांना अंधारात ठेवलं, ज्या अधिकाऱ्याने राज्यपालांना विमानात बसविले त्यांची चैाकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री असं करणार नाहीत. उद्धव ठाकरे कोत्या मनाचे नाहीत," असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज सांगितले. यामागे भाजपचं कटकारस्थान असेल, असा आरोप राऊत यांनी केला.  

मसुरी येथे आयएएस प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमासाठी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निघाले होते. नियोजनानुसार त्यांनी आधीपासूनच विमानाची नोंदणी केली होती, असे सांगितले जात आहे. त्यानुसार राज्यपाल विमानात जाऊन बसलेही. जवळपास 20 मिनिटे बसल्यानंतर त्यांच्या विमानाला सरकारची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना खासगी विमानाने जावे लागले.  

राऊत म्हणाले, "परवानगी दिली नसताना राज्यपालांना त्या विमानाने घेऊन जाणं योग्य नव्हतं. हे विमान उडण्यासाठी योग्य आहे की नाही, याची तांत्रिक माहिती घेतली नव्हती. त्यामुळे या विमानातून राज्यपालांचा घेऊन जाणं योग्य ठरलं नसतं. आम्ही राज्यपालांचा अपमान करू इच्छित नाही. यामागे भाजपचं कटकारस्थान असेल."  

हे महाराष्ट्र सरकारचं विमान आहे. त्यांना परवानगी दिली नव्हती. हे विमान नेहमीच्या दैाऱ्यासाठी वापरले जात नाही. ते आपतकालीन परिस्थिती वापरले जाते. ते नेहमीच्या प्रवाशासाठी वापरणे योग्य नाही. राज्यपालांना खासगी विमानाने जायचे होते, त्यासाठी त्यांनी नियोजन केलं होत. तर त्यांना सरकारी विमानाने जाण्याची गरज नव्हती. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असे राऊत म्हणाले.  

आघाडी सरकार आणि राज्यपालांचा विमान प्रवास यावरून राजकारण पेटलं आहे. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाणीवपूर्वक विमान प्रवासास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. या विषयावर राज्य सरकारकडून पोरखेळ सुरू आहे. हे सरकार अंहकारी आहे." 

भाजप नेते सुधीर मनगंटीवार, गिरीश महाजन यांनी राज्यपालांना विमान नाकारल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उध्दव ठाकरे सरकारमधील वाद अनेकदा झाले आहेत. गुरूवारीही राज्यपालांना शासकीय विमान नाकारण्यात आल्याचे समोर आल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचे समजल्यानंतर ते पुन्हा खाली उतरले. अखेर खासगी विमानाने ते डेहराडूनला रवाना झाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख