भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये...शिवसेनेचा सल्ला - politics shivsena slam to maharashtra bjp leader on rename of aurangabad as sambhajinagar | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये...शिवसेनेचा सल्ला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 जानेवारी 2021

औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे.

पुणे :  औरंगाबाद शहरात प्रमुख चौकांमध्ये लव्ह औरंगाबाद,लव्ह खडकी, लव्ह प्रतिष्ठान,असे डिस्प्ले बोर्ड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आले आहेत. याशिवाय महापालिकेच्या काही जागा खाजगी संस्थांना देखील सुशोभीकरणासाठी देण्यात आल्या आहेत. परंतु या डिस्प्ले बोर्ड आणि सेल्फी पॉईंटवरून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. 

औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सुरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइकचा फुगा फोडता येईल काय ते पाहावे, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. 

आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत? ते जरा जनतेला सांगून टाका! महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजी राजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत, असा सवाला अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील व औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे. 

औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील तर तो त्यांचा प्रश्न. आता प्रश्न राहिला भाजपच्या थयथयाटाचा. अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात..

  1. -अयोध्येत राममंदिर हे सर्वसंमतीने होत आहे. संभाजीनगरच्या बाबतीतही तेच होईल. बाबर हा येथील मुसलमानांचा मायबाप लागत नाही, तसा पापी औरंग्याही येथील मुसलमानांचा काका-मामा लागत नाही. 
  2. -अयोध्येत बाबरास गाडले व तेथे राममंदिर उभे राहात आहे म्हणून ना इस्लाम खतऱ्यात आला ना कुणाचा सेक्युलॅरिझम गटांगळय़ा खाऊ लागला. तसेच संभाजीनगरचे आहे. 
  3. - छत्रपती संभाजीराजांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुसलमान धर्म स्वीकारावा म्हणून मऱ्हाठय़ांच्या या राजावर औरंगजेबाने अनन्वित अत्याचार केले. पण संभाजीराजांनी हौतात्म्य पत्करून हिंदुत्व राखले. त्या औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे हा शिवरायांचाच अपमान ठरतो. 
  4. -महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादाचा मार्ग स्वीकारून शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यांना आता फालतू वाद नकोत तर विकास आणि कल्याण हवे आहे. 
     
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख