नारायण राणेंना शिवसेना पुन्हा धूळ चारणार... - Politics Shiv Sena will defeat Narayan Rane again Vaibhav Naik | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंना शिवसेना पुन्हा धूळ चारणार...

अनंत पाताडे 
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

नारायण राणेंना पुन्हा एकदा धूळ चारत शिवसेना त्यांच्या छाताडावर बसून भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

सिंधुदुर्ग : "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कितीही ताकद पुरवली तरीही नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शिवसेना शांत राहणार नाही," असे आमदार वैभव नाईक यांनी आज सांगितले.

भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण अमित शाह यांच्या हस्ते काल झाले, या पार्श्वभूमीवर वैभव नाईक बोलत होते.  

वैभव नाईक म्हणाले, "अमित शाह यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाट्टेल तितकी ताकद पुरवावी. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नारायण राणेंना पुन्हा एकदा धूळ चारत त्यांच्या छाताडावर बसून भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही. यापूर्वी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी महसुल मंत्री, उद्योग मंत्री अशी मोठमोठी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा खटाटोप केला होता. त्यावेळी नारायण राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. त्या पराभवाची नारायण राणेंनी इतकी धास्ती घेतली की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडणूक न लढवता त्यांनी अक्षरशः रणांगणातून पळ काढला.

"राज्यातील निवडणुकीत शिवसेनेसोबत युती असताना उध्दव ठाकरे हे निवडणूक प्रचाराच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो लावून प्रचार करीत होते. मुख्यमंत्रीपदावर मी कुठलीही चर्चा केली नव्हती. मी कधीही बंद खोलीत राजकारण केले नाही. पण सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना मूठमाती दिली. स्वार्थासाठी ते सत्तेत आले आहे," असे अमित शाह यांनी काल सांगितले.

अमित शाह म्हणाले, "शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं वचन दिल्याचं उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत. मी बंद खोलीत राजकारण करणारा व्यक्ती नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडपणे करतो. जनतेने जो भाजप- शिवसेना युतीला जनादेश दिला होता, या पवित्र जनादेशाचा अनादर करण्यात आला. निवडणुकीनंतर त्यांनी अपवित्र आघाडी केली. स्वार्थासाठी सरकार स्थापन झाले. ठाकरे म्हणतात, 'आम्ही वचन तोडलं' आम्ही वचन पाळणारे माणसं आहोत. बिहारमध्ये आम्हाला अधिक जागा मिळाल्या तरीही आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. नितीश कुमार यांनी 'भाजपचा मुख्यमंत्री करा' असं म्हटलं होतं तरी आम्ही शब्द पाळला"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख