पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील, भाजपनेही गुप्त आजारातून लवकर बरे व्हावे.. - politics Sharad Pawar will recover soon and start working, BJP should also recover from secret illness | Politics Marathi News - Sarkarnama

पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील, भाजपनेही गुप्त आजारातून लवकर बरे व्हावे..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मार्च 2021

भाजपने गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा 'सामना'च्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले. शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भेट झाल्याचे नाकारले नाही. पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी "प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही," असे म्हणत अधिक बोलायचे टाळले. पण शहा यांनी थेट शब्दांत ही भेट झाली नसल्याचेही अमान्य केले नाही, यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत. पवारांच्याच पुढाकाराने महाराष्ट्रातून भाजपच्या तोंडचा घास हिरावण्यात आला.

महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यांत भाजपविरोधी आघाडीस बळ देण्याची शर्थ श्री. पवार करीत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या श्री. पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे, अशी अपेक्षा 'सामना'च्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात...
शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. श्री. पवार  हे शुक्रवारी रात्री अहमदाबाद येथे खास विमानाने गेले. त्यांच्या सोबत प्रफुल्ल पटेल होते. एका बडय़ा उद्योगपतीच्या घरी ते मुक्कामाला होते. हे बडे उद्योगपती कोण हेसुद्धा उघड आहे. त्याच रात्री अमित शहा अहमदाबाद येथे पोहोचले व शहा-पवारांत देशभरात गाजत असलेली गुप्त भेट झाली. त्या गुप्त भेटीत म्हणे गुप्त खलबतेही झाली. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला. देशाचे गृहमंत्री जे कोणी असतील, ते त्यावेळी अहमदाबादेत असतील. ते आणि शरद पवारांसारखे नेते हे समजा एकमेकांना भेटत असतील तर त्यात गैर काय? पण त्यासाठी रात्रीच्या अंधारात रहस्यमय पद्धतीने कोण कशाला भेटतील? ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्याची गुप्त घरे दिल्ली-मुंबईतही आहेत व ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती काय? पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांनी पतंग उडवले.  शरद पवार  यांच्याभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे व गुळाची ढेप वितळवून टाकायची, असे भाजपचे षड्यंत्र असेल तर ते मूर्खांच्याच नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार उत्तम गतीने व नीतीने चालले आहे. शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख