"मध्यप्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्रात चालणार नाहीत...भाजपला शिवेसेनेचा इशारा 

"मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत," असा इशारा 'सामना'च्या अग्रलेखातून आज देण्यात आला आहे.
sr24.jpg
sr24.jpg

मुंबई : पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. "मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत. शेवटी राजकारणातील एक मंत्र महत्त्वाचा, तो सगळय़ांनाच लागू पडतो. ‘जे पेराल तेच उगवेल’ याचे भान प्रत्येक राज्यकर्त्याने ठेवले तर बरे,"असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. 
 

पश्चिम बंगालपासून पुद्दुचेरीपर्यंत, महाराष्ट्रापासून जम्मू–कश्मीरपर्यंत दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा हे कुणालाच शोभणारे नाही. ‘पुद्दुचेरी झाले, आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावे. महाराष्ट्राने घेतलेला निकाल हेच जनमानस आहे. महाराष्ट्राचे मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत. शेवटी राजकारणातील एक मंत्र महत्त्वाचा, तो सगळय़ांनाच लागू पडतो. ‘जे पेराल तेच उगवेल’ याचे भान प्रत्येक राज्यकर्त्याने ठेवले तर बरे!
 
भाजपने पुद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेव्हाही ‘‘पुढचा घाव महाराष्ट्रावर’’ असे जाहीरच केले होते. त्यानंतर ‘‘बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवून दाखवतो’’ वगैरे बतावण्या करून झाल्या. आता बात पुद्दुचेरीची सुरू आहे, पण जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’ असे चित्र आहे. पुन्हा मध्य प्रदेश, पुद्दुचेरीत काँग्रेस होती. महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यामुळे कोणी नसती उठाठेव करण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा 'सामना'तून देण्यात आला आहे.  

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात... 
पुद्दुचेरीतही वेगळे काय घडले? पुद्दुचेरीत सध्या जे काय घडतेय हा राजकीय वेश्या व्यवसाय असल्याचा संताप मुख्यमंत्री नारायणसामी यांनी व्यक्त केलाय, पण या वेश्या व्यवसायापासून गेल्या सत्तर वर्षांत कोणी अलिप्त राहिले आहे काय ? सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना फोडण्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी यंत्रणांचा वापर केला, असा आरोप काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी केला. 

महाराष्ट्रात नेमके हेच सुरू असल्याने पुद्दुचेरीत जे घडले त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. एकेकाळी दक्षिणेत काँग्रेसचा बोलबाला होता. आज पुद्दुचेरीसारखे लहान राज्यही त्यांच्या हाती उरले नाही. देशात आता पंजाब, राजस्थान व छत्तीसगढ येथेच काँग्रेसची सरकारे उरली आहेत. महाराष्ट्र व झारखंडमध्ये आघाडी सरकारात काँग्रेस सामील आहे. झारखंडही अस्थिर केले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला आहे. हे वातावरण लोकशाहीला मारक आहे. तत्त्व आणि नीतिमत्ता गुंडाळून फक्त सत्ता मिळविण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते चिंताजनक आहे. प. बंगालपासून पुद्दुचेरीपर्यंत, महाराष्ट्रापासून जम्मू-कश्मीरपर्यंत दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा हे कुणालाच शोभणारे नाही. 

‘पुद्दुचेरी झाले, आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावे. महाराष्ट्राने घेतलेला निकाल हेच जनमानस आहे. त्यात बदल होणार नाही. महाराष्ट्राचे मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत. शेवटी राजकारणातील एक मंत्र महत्त्वाचा, तो सगळय़ांनाच लागू पडतो. ‘जे पेराल तेच उगवेल’ याचे भान प्रत्येक राज्यकर्त्याने ठेवले तर बरे!


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com