नवी दिल्ली : कैलास पर्वत सारखी पवित्र भूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या ताब्यात का दिली, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित करीत मोदींवर आज निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे चीनला घाबरले असून ते चीनसमोर झुकले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की चीनबाबत नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन होऊ शकत नाही. चीनसोबत झालेल्या चर्चेत भारताला काय मिळालं याचं उत्तर मोदींनी जनतेला द्यावे.
हम दो, हमारे दो मधून राहुल गांधींना आपल्या कुटुंबाबद्दलच सांगायचं होतं... https://t.co/Sivrh9ccdY
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 12, 2021
काल राज्यसभेत राहुल गांधी यांनी चार लोक देश चालवितात, असा आरोप मोदींवर केला होता. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काल टीकास्त्र सोडले. 'हा देश केवळ चार लोक चालवत आहेत, 'हम दो, हमारे दो'. त्यांच्यासाठीच नोटाबंदीही करण्यात आली,' अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली होती.
राहुल गांधी यांनी काल लोकसभेत कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने कृषी कायद्यांवर चर्चा होणार नसल्याचे सांगितले. पण मी आज केवळ कृषी कायद्यांवरच बोलणार असल्याचे सांगत राहुल यांनी मोदी व शाह यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणावर अनेकदा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मध्येच भाषण थांबवावे लागले.
राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान आक्रमक पवित्रा घेतला होता. ते म्हणाले, तिनही कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांमुळे शेतकरी उध्वस्त होतील. त्यांची जमीन भांडवलदारांना जाईल. मालाला रास्त भाव मिळणार नाही. बाजार समित्यांचे अस्तित्व संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. हा देश केवळ चार लोक चालवत आहेत. हे कायदेही त्यांच्यासाठीच आणण्यात आले आहेत, अशी टीका करत राहुल गांधी यांनी अंबानी व अदानी यांनाही लक्ष्य केले.
कृषी कायद्यांमुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त होईल. देशात नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत देशातील शेतकरी, मजूर व छोट्या व्यापाऱ्यांना कमजोर करण्याचा हा प्रयत्न नोटबंदीपासून सुरू झाला आहे. ही नोटबंदीही पंतप्रधानांनी 'हम दो हमारे दो'साठी करण्यात आली.

