मुंडे यांचा राजीनामा नाही..राष्ट्रवादीच्या कोअर बैठकीत निर्णय... - Politics Munde has not resigned Decision in NCP core meeting Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडे यांचा राजीनामा नाही..राष्ट्रवादीच्या कोअर बैठकीत निर्णय...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

भाजपच्या एका नेत्याने त्या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण म्हणजे ब्लॅकमेलिंग असावं, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बोलविण्यात आलेली बैठक तीन तास चालली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक चालली. 

या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या बाबत चर्चा करण्यात आली धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे विचारपूर्वक आणि जाणून बुजून पद्धतीने करण्यात आले, शिवाय भाजपच्या एका नेत्याने त्या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण म्हणजे ब्लॅकमेलिंग असावं, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं, शिवाय या प्रकरणातील काहीच निर्णय नसेल पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावा अशी मागणीही करण्यात आली.

काल दुपारी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की धनंजय मुंडे यांना अनेक वर्षापासून  ब्लॅकमेल केलं जात होत. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा झालेली नाही. या प्रकरणाची शहानिशा झाल्यानंतर तसेच पोलिसांनी निष्कर्ष काढल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.  

काल शरद पवार यांनी सांगितले होते की, ''मुंडे हे काल मला भेटले होते. त्यांनी मला सविस्तर मला माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबध होते. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्याची चैाकशी सुरू आहे. आपल्यावर व्यक्तीगत हल्ले होऊ शकतात, म्हणून मूंडे यांनी याबाबत भूमिका घेऊन न्यायालयात गेले होते. न्यायालयाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे याबाबत भाष्य करणं चुकीचं आहे. मुंडेंनी सांगितलेली माहिती अन्य मंत्र्यांना सांगणार आहे. मी माझ्या सहकार्यासोबत चर्चा करणार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.''

मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''धनंजय मुंडे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा राजकारणाचा मुद्द्या होऊ शकत नाही. मुंडेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल हा भ्रम आहे.'' तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख